**चऱ्होली इंद्रायणी नदीवरील पूल दुरुस्तीसाठी बंद
पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांचे आवाहन**
आळंदी (अर्जुन मेदनकर):
चऱ्होली खुर्द व चऱ्होली बुद्रुक या गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल रहदारीस सुरक्षित करण्यासाठी त्याची बेअरिंग क्षमता वाढवून देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामाच्या कालावधीत पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी केले आहे.
या अनुषंगाने आळंदीत नियोजनपूर्व समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आळंदी पंचक्रोशीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील, वाहतूक पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद अधिकारी तसेच औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपायुक्त मारुती जगताप होते. त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधत वाहतुकीचा सविस्तर आढावा घेतला. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणारे भाविक, वारकरी, लग्नसमारंभांची वाहने, औद्योगिक परिसरातील कामगार बस तसेच अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुलाच्या दुरुस्ती कालावधीत रहदारी सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी अवजड वाहनांना आळंदी शहरात प्रवेशबंदी, पर्यायी मार्गांचा वापर, दिशादर्शक फलक लावणे, पार्किंग व्यवस्था नियोजन, नगरप्रदक्षिणा मार्गावर वाहनांना थांबण्यास मनाई, तसेच आळंदी–मरकळ रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील यांनी सांगितले की, पुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पुलाला जोडणारे रस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत विकसित होणे आवश्यक आहे. ४५ मीटर रुंदीचा आळंदी बाह्यवळण मार्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट असून तो पूर्ण क्षमतेने विकसित करण्याची मागणी चऱ्होली ग्रामस्थांनी केली आहे.
बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, शांतता समितीचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.