छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे वेध
जालन्यात नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद
नांदेड दि. 18 :- नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत (छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने) राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा स्पर्धेच उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्तासह, नांदेडचे यापूर्वीचे सर्व जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्ये्ने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्याावतीने घेण्यात येत आहेत.
जालण्याला नुकतेच विभागीय महसूली स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. आता विभागस्तरावर प्रत्येक खेळासाठी विभागाची एक चमू तयार होत आहे. त्यांचे कॅम्प लागले असून नांदेड येथे त्यांचा सराव सुरू आहे. जालन्यात परस्परांविरुद्ध खेळणाऱ्या चमू आता एक चमू बनून विभागांची लढणार आहे थोडक्यात कोकण पुणे ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती ,नागपूर अशा सहा विभागामध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लढत होणार आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धा विभागस्तरावरच विभाग अर्थात विभाग मुख्यालयी झालेल्या आहे. नांदेड मधील क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत विकासामुळे छत्रपती संभाजी नगर विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेडमध्ये होत आहे .या आयोजनाचे नांदेडला बहुमान मिळाला आहे.
यजमान छत्रपती संभाजीनगर विभाग असून आता छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे लक्ष आहे. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरु असून सर्व महसूल अधिकारी कर्मचारी क्रिडा स्पर्धाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिघजी स्टेडियम हे या क्रीडा स्पर्धासाठी सज्ज झाले आहे.
महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी मुख्य अतिथी राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, लोकसभा सदस्य प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण, हिंगोलीचे लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर, लातूरचे लोकसभा सदस्य डॉ. शिवाजीराव काळगे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर, विधान सभा सदस्य आनंद तिडके, विधान सभा सदस्य प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर, विधान सभा सदस्य डॉ. तुषार गोविंदराव राठोड, विधान सभा सदस्य राजेश पवार, विधान सभा सदस्य भिमराव केराम, विधान सभा सदस्य जितेश अंतापूरकर, विधान सभा सदस्य बाबुराव कदम कोहळीकर, विधान सभा सदस्य श्रीजया चव्हाण, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची उपस्थिती राहणार आहे.
21 ,22 ,23 फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धा सर्व नागरिकांना बघता येणार आहे. 21 व 22 फेबुरवारीला दररोज रात्री सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहे. यामध्ये विविध कलाविष्कार बघायला मिळणार आहे.
क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुल्या आहेत. या आयोजनाचा आनंद सर्वांना घेता येईल.
जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी यानिमित्ताने शहरात येणार आहे त्यांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले दररोज या स्पर्धा संदर्भात आढावा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला व क्रीडा सुविधांना राज्यस्तरावर मानांकित करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. यानिमित्ताने नांदेडच्या क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मजबूत करण्यात येत आहे.