logo

झाडांच्या वाढदिवशी समाजाला दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश व्हि. झेड. पाटील हायस्कूलमध्ये हरित मैत्रीचा अनोखा उत्सव

झाडांच्या वाढदिवशी समाजाला दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

व्हि. झेड. पाटील हायस्कूलमध्ये हरित मैत्रीचा अनोखा उत्सव

अमळनेर प्रतिनिधी
शिरुड (ता. अमळनेर) येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूल परिसर काल हरितमय आनंदात न्हाऊन निघाला होता. शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच झाडांचे संगोपन करणारे उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शाळेतील लावलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या हरित सोहळ्याची सुरुवात झाडांना फुगे, बलून आणि राखी बांधून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते झाडांचे पूजन झाले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकारामांच्या अभंगातील संदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्षभर काळजीपूर्वक संगोपन केलेल्या झाडांना जणू आप्तस्वकीयाचा मान देत हा सोहळा रंगला.
शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झाडांच्या फांद्यांना रंगीबेरंगी सजावट केली, परिसर स्वच्छ ठेवून या दिवसाचे औचित्य साधले. वातावरणात हिरवाईसोबतच आनंद, कृतज्ञता आणि अभिमान यांचा संगम जाणवत होता.
हा उपक्रम केवळ शालेय स्तरावर मर्यादित न राहता समाजाला “झाडे लावा, झाडे जगवा” या संदेशाचा प्रसार करणारा ठरला. झाडांचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी या हरित मैत्रीचे कौतुक केले.
पर्यावरण संवर्धनाच्या या अनोख्या उपक्रमातून शिरुड गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, “जमिनीवर उगवणारी प्रत्येक रोपटं हे आपलं कुटुंबीय आहे” हा भावनिक संदेश सर्वत्र पसरला.

1
57 views