*स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*
लातूर, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान गावागावांत पोहचवून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाची जिल्हास्तरीय सुरुवात लातूर स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेश येथील धार येथे झालेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्रेरणा होनराव, अजित पाटील कव्हेकर यावेळी उपस्थित होते.
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि क्षयरोगाची तपासणी केली जाईल, विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी, ॲनिमिया तपासणी आणि समुपदेशन केले जाणार आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. ग्रामीण भागातील महिलांचे विविध कारणांमुळे दुर्लक्ष होत असते. मात्र, या अभियानामुळे महिलांच्या आरोग्याची समस्या दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
या अभियानाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात येत आहेत. यात संसर्गजन्य रोग तपासणी, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि हृदयाचे रोग तपासण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत फूड बास्केटचेही यावेळी वितरण करण्यात आले.
****