अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या*
*गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन*
नांदेड, दि. 8 जून : उत्पन्न आणि उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहिमेला वेग दिला आहे. यंदा मान्सूनवर ‘अल-निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 13 हजार जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, एका सहायक कृषी अधिकाऱ्याने सरासरी 37 मोहिमा पूर्ण केल्या आहेत. या मोहिमा पुढेही सुरू राहणार असून, त्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने किमान 50 मोहिमा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पेरणीपासून काढणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेरणीपूर्व काळात प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने दोन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
गेल्या वर्षी खरीप पिके अंतिम टप्प्यात असताना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा पेरणीपूर्वीच ‘अल-निनो’चे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने कृषी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध मोहिमा आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.
या कार्यशाळांचे आयोजन गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागाने सकाळी किंवा रात्री केले जात आहे. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
बदलत्या हवामानाचा विचार करून पीक नियोजन, पीक पद्धतीतील बदल, पाणी व्यवस्थापन आणि इतर आवश्यक कृषी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना संभाव्य हवामान बदलांचा सामना करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मोहिमांचे स्वरुप काय ?
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य नियोजनाची जोड मिळावी याकरिता कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पेरणी पुर्व मोहीम व पेरणी पश्चात मोहीमेचा समावेश आहे.
*पेरणी पुर्व मोहीम :-* माती परीक्षणाच्या आधारे कृषी निविष्ठाच्या वाजवी वापरासाठी मोहीम, टंचाई परिस्थितीत फळबागा वाचविणे व फळबाग लागवडीमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर, अल निनो बाबत जागरुकता करणेसाठी शिवार फेरीचे आयोजन, घरगुती चाचणी पद्धतीने बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, बीज प्रक्रिया मोहीम, बीबीएफद्वारे उताराला आडवी पेरणीचा प्रचार व प्रसार करणे, सापळा पिकांची लागवड बाबत प्रचार व प्रसार करणे, शून्य/कमी मशागत पद्धत अवलंब करणे, खरीप हंगाम तयारी व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण, पाणी फौंडेशन डिजिटल शेतीशाळा बाबत प्रचार व प्रसिद्धी, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड प्रचार व प्रसिद्धी, महाविस्तार ॲप व कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाच्या साधने बाबत प्रचार व प्रसिद्धी.
*पेरणी पश्चात मोहीम :-* हिरवळीच्या खतांची निर्मिती, बायोफर्टीलायझर, बायोपेस्टीसाईड निर्मितीसाठी शेतावर फार्म लॅब स्थापन, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत यांसारख्या जैविक निविष्ठा निर्मिती करणेबाबत प्रचार प्रसिद्धी करणे,ऊस पाचट व्यवस्थापन,हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन मोहीम,शंखी गोगलगाय निर्मुलन जनजागृती मोहीम,बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन मोहीम तसेच कार्यशाळा गावोगावी आयोजित करण्यात येत आहेत.