logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रातील पहिल्या सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न.....


अकोले (अहिल्यानगर) : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "तालुका तिथे संगीत विद्यालय" या अभिनव संकल्पनेअंतर्गत संस्थेच्या महाराष्ट्रातील पहिल्या सांस्कृतिक केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दि. १ जून २०२६ रोजी अबीटखिंड (भोजनेवाडी), ता. अकोले येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष तसेच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

राज्यभरातील कला आणि संगीत क्षेत्रातील उपेक्षित कलावंत, तसेच दुर्गम गावांमध्ये जन्मलेल्या कलाकारांना न्याय, हक्क आणि सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभी राहिलेली ही संस्था अल्पावधीतच महाराष्ट्रभर पोहोचली आहे. हजारो सदस्यसंख्या असलेल्या या संस्थेने केवळ स्वप्ने पाहिली नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. कलाकारांच्या मनातील आशा आणि आकांक्षांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य संस्था करत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

संस्थेने "तालुका तिथे संगीत विद्यालय व सांस्कृतिक केंद्र" हे ध्येय समोर ठेवून कार्य सुरू केले आणि आज जवळपास महाराष्ट्रातील २२ तालुक्यांमध्ये संस्थेला दानस्वरूपात जागा उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी भविष्यात भव्य संगीत, कला आणि सांस्कृतिक केंद्रे उभारली जाणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कला, संगीत आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार असून नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "संस्थापक-अध्यक्ष श्री. राजारामबुवा शेळार यांनी उराशी बाळगलेला सांस्कृतिक चळवळीचा ध्यास, ग्रामीण भागातील कला-संगीताला नवे व्यासपीठ देण्याचे स्वप्न आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याची जिद्द आज प्रत्यक्ष वास्तवात उतरलेली पाहण्याचा क्षण प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे."

संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा संघटक सचिव संदीप जाधव आपल्या मनोगतात म्हणाले, "अखंड महाराष्ट्रभर शेळारबुवांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून, उन्हा-पावसाची पर्वा न करता, गावोगाव फिरून संस्कृती, कला आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचविण्याचे अविरत कार्य केले आहे. अनेक अडचणी, संघर्ष आणि आव्हाने स्वीकारत त्यांनी संस्थेचा रथ सातत्याने पुढे नेला. केवळ संस्था उभी करणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर समाजात संस्कार, कला आणि प्रतिभेला योग्य दिशा मिळावी, हा त्यामागचा मोठा विचार होता."

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थापक-अध्यक्ष श्री. राजारामबुवा शेळार आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, "आज भूमिपूजनाच्या निमित्ताने अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांचे, त्यागाचे आणि संघर्षमय प्रवासाचे मूर्त स्वरूप सर्वांना पाहायला मिळत आहे. ही केवळ एका इमारतीची पायाभरणी नाही, तर हजारो कलाकारांच्या स्वप्नांची, विद्यार्थ्यांच्या भविष्याची आणि सांस्कृतिक नवयुगाची सुरुवात आहे. माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे सदस्य आणि विशेषतः संस्थेवर विश्वास ठेवून दान दिलेल्या सर्व दानशूर सहकाऱ्यांचे व त्यांच्या परिवारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा संघटक सचिव संदीप जाधव, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने, राज्य कार्यकारिणी सदस्य विनोद शिंदे, शैलेश विरखरे, अशोक कदम, प्रवीण तांबे, सांगली जिल्हाध्यक्षा प्रणाली पाटील, मुंबई उपनगर अध्यक्ष निलेश गुंडाळे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक मांढरे, सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत घुडेकर (लोकनाट्य तमाशा सम्राट), राज्य कार्यकारिणी सदस्य विकी खोकरे, शाहीर अशोक बागुल (संभाजीनगर) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन विधी संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला आणि संस्कृती संवर्धनास मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कला रसिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच भोजनेवाडी येथील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

– प्रसिद्धी विभाग
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

29
2402 views

Comment