आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धडक ॲक्शन मोड; दोन दिवसांत राज्यभरात मोठ्या कारवाया
*आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धडक ॲक्शन मोड; दोन दिवसांत राज्यभरात मोठ्या कारवाया*
अन्न आणि औषध प्रशासन विभाग (FDA) चे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा लावला असून भेसळखोर, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रेते आणि रसायनांचा वापर करून फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी, २६ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे रसायनांचा वापर करून पिकवण्यात आलेले सुमारे ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. या कारवाईत तब्बल ४० हजार ९६० रुपयांचे तूप जप्त करण्यात आले असून संबंधितांवर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी, २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. या खव्याची किंमत सुमारे ४७ हजार ३०० रुपये असल्याचे समोर आले असून या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासनासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीनंतर FDA विभागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम आणि कठोर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची चर्चा प्रशासन व जनतेमध्ये सुरू झाली आहे. बनावट औषधे, अन्नभेसळ, परवान्यांमधील गैरव्यवहार तसेच ऑनलाइन औषध विक्री यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आता अधिक कठोर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यां विरोधातील या धडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून राज्यभरात FDA विभागाची ही मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे.