logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन* *जिल्हाधिकारी यांनी स्विकारला पदभार*



नांदेड, दि. 22 मे : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज पदभार स्वीकारला.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुराज हिरे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर बँकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत बँकेच्या प्रशासकीय व आर्थिक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणीही केली.

या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, वैधानिक परीक्षक रोहित लोहिया तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 3 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात आल्याने नव्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 77-अ (1) (दोन) नुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभ करून बँकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे यासाठी जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांची 27 एप्रिल 2026 रोजी “प्राधिकृत अधिकारी” म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी पदभार स्वीकारून बँकेचे प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले होते.

यानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथील अपर निबंधक तथा सहसचिव यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांची बँकेच्या “प्राधिकृत अधिकारी” पदावर नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी 20 मे 2026 रोजी आदेश जारी करून शाहुराज हिरे यांच्या जागी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली.

त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 22 मे 2026 रोजी सकाळी प्राधिकृत अधिकारी पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसह दैनंदिन कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

7
726 views

Comment