"जोखड" अंधश्रद्धेची समाजाला विचार करायला भाग पाडणारा आशयघन मराठी चित्रपट.....
जोखड युगातही अंधश्रद्धेची बेडी समाजाच्या मनावर घट्ट बसलेली आहे. विशेषतः मंगल दोष या गैरसमजामुळे अनेक मुला-मुलींच्या आयुष्यात लग्नासाठी अडथळे निर्माण होतात. या संवेदनशील आणि वास्तववादी विषयावर थेट भाष्य करणारा मराठी चित्रपट जोखड अंधश्रद्धेची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दक्ष फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत, सविता पाटील निर्मित आणि सुनील पाटील लिखित व दिग्दर्शित या चित्रपटातून अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे वास्तव उलगडण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आपण विज्ञानाच्या युगात जगतो आहोत की अंधविश्वासाच्या सावलीत?
या चित्रपटात राहुल पाटील, मिताली भंडारी, निकिता पाटील, कल्पना बोडस, राजेंद्र भंडारी, श्रीधर करडे, श्रीधर कांबळे, सुनील पाटील, रितेश मरापे आणि ज्योत्स्ना रोकडे यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून कथेला वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी बनवले आहे.
चित्रपटाचे संगीतकार व गायक विनोद धोत्रे यांचे सुरेल संगीत, तसेच महाराष्ट्राचा लाडका आवाज आदर्श शिंदे आणि कविता राम यांच्या गायकीने चित्रपटाला भावनिक उंची प्राप्त झाली आहे.
छायाचित्रण विशाल कांबळे आणि शिवा कांबळे यांनी प्रभावीपणे हाताळले असून, संकलन उन्नी नायर, शिवा कांबळे आणि श्रद्धेय केदार यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन ओंकार मानवेल यांचे असून, निर्मिती प्रमुख म्हणून ज्योत्स्ना रोकडे यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
जोखड अंधश्रद्धेची हा चित्रपट समाजातील अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकत, ती थांबवण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा ठोस संदेश देतो.