logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी



*नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात*

नांदेड दि. 24 एप्रिल : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४,३४,८१९ शेतकऱ्यांनी ८,२९,७३७ विमा अर्ज दाखल केले असून ५,१३,९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी रु.८१३.९३ कोटी रक्कम मंजूर झाली असून पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास दि.२१.०४.२०२६ पासून सुरुवात झाली आहे.

योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असून जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. सदर पिकांचे जिल्ह्यात ३३१२ पिक कापणी प्रयोग नियोजित होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर पिक नुकसान झाल्यामुळे श्री. राहुल कर्डिले मा.जिल्हाधिकारी, नांदेड व श्री. दत्तकुमार कळसाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पिक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन करून महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पिक कापणी प्रयोग CCE मोबाईल app वर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली. पिक कापणी प्रयोगाचे काम सुरु असताना पिक विमा कंपनी कडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पिक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त रु.८१३.९३ कोटी रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर रु.८१३.९३ कोटी रकमेचे वितरण सुरु असून सर्व विमाधारक शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर शेतकरी लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून OTP प्रविष्ट केल्यावर आपली मंजूर रक्कम पाहता येईल.

30
421 views

Comment