logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी



प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करावे- जिल्हाधिकारी

नांदेड, दि. 14 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या औचित्य साधून नागरी हक्क संरक्षण अंतर्गत अत्याचारग्रस्त दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील 13 पात्र वारसांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 लाभार्थ्यांना जमिनीचे आदेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सांस्कृतिक सभागृहात मुख्य कार्यक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तर प्रमुख पाहुणे जिल्हा जात पडताळणी कार्यालयाच्या उपायुक्त छाया कुलाल या होत्या. तर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सेवानिवृत्त वरिष्ठ निरीक्षक अशोक गोडबोले, समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, दलित मित्र पुरस्कार प्राप्त माधव आंबटवाड, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण उपस्थित होते.

प्रमुख व्याख्याते म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अजय गव्हाणे आणि सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप गोणारकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. त्यांनी 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित सामाजिक समता सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. डॉ. अजय गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर सखोल मार्गदर्शन केले. तर प्राचार्य प्रा. संदीप गोणारकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाची माहिती देत मानवी हक्कांचे महत्त्व स्पष्ट केले.

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत संविधानाच्या प्रस्ताविकेचे नियमित सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, लघुनाट्य, पथनाट्य अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिला जागर मेळावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि ‘घरघर संविधान’ यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.

समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्याद्वारे समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाने सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

यापूर्वी सकाळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0
69 views

Comment