चालकाला डुलकी लागली अन् रेतीचा टिप्पर पलटी; शेळगाव नृसिंह येथील घटना, मोठा अनर्थ टळला
देगलूर:-
तालुक्यातील शेवाळा - देगलूर रस्त्यावरील शेळगाव नृसिंह येथे ८ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वा. सुमारास एक भीषण अपघात झाला. रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाले. ही घटना गावातील हत्ती सर यांच्या घराजवळ घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच २६ बी ई १७०७ क्रमांकाचा टिप्पर सकाळी ६:३० वाजता रेती घेऊन सगरोळी येथुन शेळगाव नृसिंह मार्गावरून देगलूर कडे जात होता. शेळगाव नृसिंह शिवारात हत्ती सर यांच्या निवासस्थानाजवळ टिप्पर आला असता, चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव टिप्पर रस्त्याखाली जाऊन पलटी झाला.
पहाटेची वेळ असल्याने आणि सुदैवाने रस्त्यावर व घराबाहेर वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात टिप्परचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भविष्यात अशा घटनांमुळे कोणतेही अनुचित प्रकरण किंवा मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने या मार्गावरील जड वाहनांच्या वेगावर आणि वाहतुकीच्या नियमांवर नियंत्रण ठेवावे, असेही बोलले जात आहे.