कळंब येथे महावितरणच्या दारात उभारली स्मार्ट मिटरची गुढी
कळंब ४५०० ग्राहकांची वीज बंद केल्यामुळे आंदोलन धाराशिव :- प्रतिनिधी विकास वाघ. दहावी बोर्ड परीक्षा सुरू असताना महावितरण कंपनीकडून कळंब शहरासह तालुक्यातील ४५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. महावितरण चा निषेध म्हणून कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महावितरण कंपनीच्या दारात होळी सणाच्या दिवशीच वीज बिलांची होळी केली होती. महावितरण कडे मुळे यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात तीन प्रश्न विचारून खुलासा करण्याची मागणी केली होती. तक्रारीत म्हटले होते की, कळंब शहरात घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या किती आहे व त्यापैकी किती ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले.
ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले त्यांची स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली होती का. स्मार्ट मीटर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी महावितरणने वीज वापर करणाऱ्या सर्व स्मार्ट मीटर ग्राहकांना थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा वरिष्ठ पातळीवरून ऑटो डिस्कनेक्ट आपोआप बंद होणार आहे याबाबत सूचना दिल्या होत्या का याचा लेखी खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु महावितरण कंपनीने खुलासा न करता भस्मासुराप्रमाणे ग्राहकांची पिळवणूक करून आर्थिक लूट सुरूच ठेवली याचा निषेध म्हणून कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी गुढीपाडवा सणाच्या दिवशी महावितरण कंपनीच्या दारात चक्क स्मार्ट मीटर ची गुढी उभारून अनोखे आंदोलन केले.