महाराष्ट्र हादरला! रील स्टारकडून प्रोफेसरचा मर्डर; 8 तास मृतदेह घेऊन फिरला 40 दिवसांनी खुलासा.....
राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून रोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र आता छत्रपती संभाजी नगरमधून समोर आलेली बातमी अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणामधील प्रमुख आरोपी हा एक प्रसिद्ध रील स्टार असल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणामध्ये तब्बल 40 दिवसांनंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहचले आहेत.
मयत व्यक्ती आहे तरी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरच्या ज्योतीनगरमधून बेपत्ता झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त विभागप्रमुख राजाभाऊ सुभराव लोंढे यांची हत्या करण्यात आली आहे. 50 लाख रुपयांच्या वादातून राजाभाऊ यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात राजाभाऊ यांचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार 40 दिवसांपूर्वी घडला असून सातत्यपूर्ण तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.
जंगलामध्ये पुरला मृतदेह
आरोपींनी राजाभाऊंची हत्या करुन त्यांचा मृतदेह गेवराई तांड्यातील जंगलात 8 फूट खोल खड्ड्यात पुरला होता. प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड हा रील स्टार आहे. विशालने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने राजाभाऊंना संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकं फार्महाऊसवर घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजाभाऊ हे त्यांचा मित्र असलेल्या विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य दोन महिलांसोबत 5 फेब्रुवारी रोजी दौलताबादमधील फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते. फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते. 6 फेब्रुवारी रोजी पहाटे आरोपी विशालने राजाभाऊंना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचा बनाव रचला. मात्र, ते घरी न आल्याने राजाभाऊंचे बंधू उत्तम यांनी उस्मानपुरा ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. महिना उलटूनही शोध लागत नसल्याने नातेवाईकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर तपासला वेग आला.
आरोपीने दिली कबुली
राजाभाऊंना शेवटी कोणासोबत पाहण्यात आलेलं या आधारे विशालपासून चौकशी सुरुवात करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर विशालने लगेच आरोप कबूल केला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. आरोपी विशाल, आकाश आणि त्यांचा तिसरा साथीदार करण आडे यांनी गेवराई तांडा येथील जंगलात जेसीबीच्या साहाय्याने आधीच खोदलेल्या खड्ड्यात लोंढे यांचा मृतदेह पुरला. 40 दिवसांनंतर रविवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
मृतदेह घेऊन 8 तास फिरत होते
आरोपी विशालने दिलेल्या कबुली जबाबामध्ये राजाभाऊंची हत्या केल्यानंतर रक्ताने माखलेला मृतदेह गाडीच्या डिकीत टाकून आरोपी छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये सुमारे 30 किलोमीटर अंतर फिरले, असं सांगितलं आहे. 8 तास हे आरोपी मृतदेहासह रस्त्यावर फिरत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
ती महिला कोण?
फार्महाऊसवर राजाभाऊंची हत्या झाली तेव्हा तीन आरोपींसोबतच दोन महिलाही होत्या. त्यामुळेच 60 वर्षीय राजाभाऊंची 24 वर्षीय विशालसोबत ज्या महिलेच्या माध्यमातून ओळख झालेली तिचा या कटात सहभाग तर नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी तपासाच्या अँगलमध्ये 'हनी ट्रॅपिंग'चा दृष्टीकोनही विचारात घेतला आहे. सदर महिलेच्या माध्यमातून या हत्येस कारणीभूत ठरलेला 50 लाखांचा व्यवहार तर झाला नव्हता ना याचाही तपास पोलीस करत आहेत.