logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

41 °C ते मुसळधार... राज्यातलं हवामान असं डेंजर का झालंय? कुठे? का पडणार उन्हाळी पाऊस......?

 एकीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पार 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान असतानाच दुसरीकडे पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वाऱ्यासहीत पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मार्च हीटमुळे मुंबई, पुण्यातील लोक वैतागलेले असतानाच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये अचानक पावसाचा इशारा का देण्यात आला आहे? नेमकं असे काय बदल घडले आहेत की एकीकडे न सोसणारी उष्णता तर दुसरीकडे वादळी वाऱ्यांसहीत पाऊस पडणार आहे? हेच आपण सविस्तरपणे समजून घेऊयात...

पावसाचा इशारा का?

विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती (ट्रफ) निर्माण झाली आहे. याच स्थितीमुळे पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील आणि जिल्ह्यांत मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  केले आहे. 

या विचित्र स्थितीचा काय परिणाम झालाय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. द्रोणीय स्थितीमुळे एकाच वेळी अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जनेसह उन्हाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान  विभागाने व्यक्त केला आहे.

द्रोणीय स्थिती (ट्रफ) म्हणजे नेमकं काय?

अगदी थोडक्यात सांगायचं झालं ट्रफ स्थिती निर्माण झाली तर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वातावरणात अस्थिरता असल्याने वादळी वाऱ्यासहीत पाऊस पडतो. ट्रफमध्ये हवा वरच्या दिशेने जाते, ज्यामुळे ढग तयार होतात. हवेतील आर्द्रता अचानक वाढते आणि पाऊस, वादळ किंवा अस्थिर हवामान निर्माण होते.

मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतकऱ्यांना आवाहन

दरम्यान, कृषी विभागाने 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित साठवून किंवा झाकून ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच, हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची नियोजित कामे करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

अमरावतीत देशात सर्वाधिक तापमान

देशातील सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद विदर्भातील अमरावती येथे झाली. अकोल्यात 41.5, वर्ध्यात 40.6, सोलापूर 40.1 आणि मालेगावमध्ये 40 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. शनिवारपासून तापमानात काहिशी घट होऊन दिलासा मिळेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाट होती. गेल्या दोन - तीन दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्रावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. 

फेब्रुवारीतील चूक टाळण्यासाठी आवाहन

मार्चच्या मध्यात जोरदार पावसाची शक्यता असतानाच फेब्रुवारीत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे 78 हजार हेक्टर शेती आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा नेमका आकडा आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार मदत करण्यात येईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. कृत्रिम प्रज्ञा (एआय), ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर करून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे 40 टक्के वाढ होईल, खतांचा वापर 30 टक्क्यांनी कमी होईल आणि पाण्याची 40 ते 50 टक्के बचत होईल. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रयोगातून हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील शेती आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. फेब्रुवारीप्रमाणे पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आता आधीपासूनच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा अगदी हवामान खात्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच दिला आहे.

48
1324 views

Comment