logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जागतिक महिला दिन ८मार्चसाठी विशेष लेख*



*महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*

8 मार्च जागतिक महिला दिन. हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज परिवर्तनाच्या वाटचालीत स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा केवळ घोषवाक्य न राहता तो घराघरात कृतीत उतरला पाहिजे. त्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांनी काकणभर पुढे सहभाग नोंदवला पाहिजे. त्यासाठी आपापल्या घरातील मुलींना नव्हे मुलांना लिंग समानतेचा संदेश देण्याची, आजची खरी गरज आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण, गृह, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व जवळपास सर्वच विभागामार्फत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना व धोरण राबवले जाते. राज्य महिला आयोगही स्वतंत्रपणे काम करते. मात्र शासनासोबतच समानतेच्या शिक्षणाची घराघरात प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे.

भारतीय समाजाने परंपरांचा वारसा जपला आहे; या परंपरांमध्ये पितृसत्ताक विचारांचा पगडा अद्यापही दिसून येतो. घरामध्ये मुलगा आणि मुलगी यांना समान संधी, वागणूक आणि प्रोत्साहन मिळणे अजूनही सर्व स्तरांवर पूर्णत्वास गेलेले नाही. मुलाने कसे वागावे, मुलीने कसे वागावे, कोणते कपडे योग्य आणि कोणते अयोग्य, अशा अनेक पूर्वग्रहांनी अजूनही अनेक घरांची दारे बंदिस्त आहेत. या बंद दारांना उघडण्याची किल्ली म्हणजे शिक्षण,संवाद आणि आधुनिक दृष्टिकोन. आजच्या नवशिक्षित व अशिक्षित मातांनीही नव्या समाज निर्मितीसाठी आपले हे दायित्व समजून घेणे म्हणजे महिला दिन साजरे करणे होय.

लहानपणापासूनच मुलांना ‘हे मुलांचे काम, हे मुलींचे काम’ असे शिकवले तर त्यांच्या मनावर लिंगभेदाचे ठसे उमटतात. यामुळेच आपल्यापेक्षा वयस्क आईला पिण्याचे पाणी हातात मागणारी,जेवणाचे ताट धुवायला लावणारी,आंघोळीनंतर स्वत:ची चड्डी बनियनही धुवायला लावणारी पिढी अजूनही अस्तित्वात आहे. एकीकडे ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ म्हणायचे आणि स्वतःचे ताट आईला धुवायला लावायचे. यामध्ये सर्वात वाईट म्हणजे आईने म्हातारपणाची काठी म्हणून धन्यता मानायची, ही संस्कृती आपल्यातला लिंगभेद कधीही नष्ट करणार नाही. त्यामुळे मुलगा असो की मुलगी लहानपणापासूनच घरकाम, खेळ, बालसंगोपन, आई-वडिलांच्या म्हातारपणाची जबाबदारी , आर्थिक निर्णयप्रक्रिया यामध्ये समान सहभागाची सवय लावणे गरजेचे आहे. किंबहुना घरातील वडिलांनी याबाबत आदर्श पुढे ठेवणे गरजेचे आहे.

सहशिक्षण आणि परस्पर आदराची जाणीव ही समतेची पहिली पायरी आहे. शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी ‘आपली मैत्रीण ही कुणाची तरी बहीण आहे’ आणि ‘आपल्या बहिणीलाही मित्र असू शकतो’ ही सहज आणि सन्मानपूर्वक मान्यता देणे,ती मुलांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर स्त्री व पुरुष या लिंगासोबत एक तृतीय लिंगी समाज आपल्याच घरातून तयार होतो. अशा मुलांना, मुलगा किंवा मुलगी म्हणून नैसर्गिक बदलानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा तृतीय पंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा तुमच्या सारखाच अधिकार आहे, ही जाणीव मुलांना लहाणपणीच होणे आवश्यक आहे. ही जाणीव मुलांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवते.

वयात येणे ही प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. या विषयांवर घराघरांत मोकळेपणाने, वैज्ञानिक दृष्टीकोनातून चर्चा होणे आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण ही संस्कृतीवरील घाला नसून नव्या विज्ञानवादी संस्कृतीची पायाभरणी आहे.माध्यमिक शिक्षणात प्रजनन आणि लैंगिक आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गैरसमज, भीती आणि चुकीच्या समजुती दूर होऊ शकतात. अगदी लहान वयातच ‘गुड टच - बॅड टच’ याची माहिती मुलांना देणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा शिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये घरात होणाऱ्या लैंगिक शोषणाला, नात्यात होणाऱ्या लैंगिक शोषणाला या छोट्याशा गोष्टीमुळे पायबंद बसू शकतो, हे लक्षात घेण्याचाही आजचा दिवस आहे.

घरामध्ये आईची भूमिका या परिवर्तनात अत्यंत महत्त्वाची ठरते. आई ही केवळ कुटुंबाची आधारवड नसून मूल्यांची पहिली शाळा असते. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद न करता दोघांनाही समान प्रेम, समान शिस्त, समान जाणीव आणि समान संधी देणे हे तिच्या हातात आहे. मुलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे, मुलींना स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे, महिलांप्रती मुलांमध्ये आदर निर्माण करणे, या कृतीतून समतेचा पाया मजबूत होतो. कुणाचीही बहिण असो, तिच्यासोबत कसे वागावे, याचे बाळकडून प्रत्येक घरातील आईनेच देणे महत्वाचे आहे. घरातून हा भेद नाकारला, घरातून त्यासाठी कृतीशील वस्तूपाठ अंमलात आला तर ‘निर्भया’ प्रकरणासारख्या घटना देशात घडणार नाही. या पायाभरणीची शपथ घेण्याचाही आजचा दिवस आहे.

संपत्ती आणि वारसा या संदर्भातही समानतेची जाणीव रुजवणे आवश्यक आहे. 'बायकांना व्यवहारात ठेवू नये ', 'महिलांना व्यवहारातले काय कळते ', या पूर्वापार अंधश्रद्धांना दूर करण्याचाही आजचा दिवस आहे.

शेतीच्या काही गुंठ्यांसाठी सही करण्यापुरतीच बहिणीची भूमिका मर्यादित नाही, हे समजून घेतले पाहिजे. जमिनीच्या बाबत तिचे स्वप्न, तिची मेहनत आणि तिचे निर्णय यांनाही स्थान असायला हवे. लहानपणापासूनच मुलींना आर्थिक साक्षरता, मालमत्तेची जाणीव आणि स्वावलंबनाचे शिक्षण देणे ही नव्या समाजव्यवस्थेची गरज आहे. यासाठी स्वतः आईने या समान हक्काची पेरणी लहानपणीच करण्याचा आजचा दिवस आहे.

कर्मकांड आणि रूढीपरंपरांमध्ये स्त्रियांच्या शुद्ध-अशुद्धतेच्या मान्यता आजही काही ठिकाणी आढळतात. परंतु नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया ही कोणत्याही प्रकारे अपवित्रतेचे लक्षण नाही. देवाला जर काही अपवित्र वाटले असते तर त्यांनी ही क्रियाच निर्माण केली नसती.त्यामुळे शुद्ध अशुद्ध हा भेद कर्मकांडातूनच निर्माण झाला आहे.मासिक पाळी हा स्त्रीदेहाचा नैसर्गिक भाग आहे. यावर खुली चर्चा झाली पाहीजे. या काळात स्त्रियांना वेगळे ठेवणे, त्यांच्या हातचे अन्न न खाणे किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ न देणे या कालबाह्य समजुतींना आता तिलांजली देणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ, विवेकी आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारून अशा रूढींचा पुनर्विचार करणे हीच खरी संस्कृतीची प्रगती आहे. यातूनच आपली संस्कृती प्रगल्भ होईल. संस्कृती, धर्म, रुढी,परंपरांच्या नावाखाली ज्या घरांमध्ये हा अघोरी उच्छाद सुरू आहे, ती घरे सुसंस्कृत समजायची का यावर चिंतन करण्याचाही आजचा दिवस आहे.

सामाजिक व्यवहारातही समानतेची जाणीव महत्त्वाची आहे. मुलगी सासरी जाणे हीच एकमेव दिशा नसून घरजावई होणेही तितकेच सन्माननीय असू शकते, ही मानसिकता समाजात रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे जशी आपली मुलगी सासरी जाऊ शकते तसाच आपला मुलगा घर जावई जाऊ शकतो, हे सामाजिक सत्य बिंबविण्याचाही आज दिवस आहे.
कार्यालयातील महिलांच्या पेहरावावर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उपरोधिक टिप्पणी करणे ही सवय थांबली पाहिजे. एखाद्या महिलेच्या पोशाखाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणे हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान तर आहेच, पण आपल्यातील समतेच्या शिक्षणातील उणीवही दर्शवते.परस्पर आदर आणि व्यावसायिकता ही आधुनिक समाजाची ओळख असली पाहिजे.
आजच्या भारतात अशी परिस्थिती निर्माण व्हावी की अर्ध्या रात्री एकटा जाणारा मुलगा आणि एकटी जाणारी मुलगी, या दोघांच्या सुरक्षिततेत कोणताही फरक उरू नये. ही सुरक्षितता केवळ कायद्याने नव्हे, तर घराघरातल्या संस्कारांनी निर्माण होते. मुलगा आणि मुलगी यांच्यातील अंतर कमी करून, त्यांना समानतेचे आणि सहजीवनाचे मूल्य शिकवूनच हा बदल साध्य होईल.तो बदल साधण्यासाठी वचनबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे.

जगातील अनेक देशांनी लिंग समानतेच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ स्वीडन, नॉर्वे, फिनलँड या देशांमध्ये पालकत्व रजेचे धोरण स्त्री-पुरुष दोघांसाठी समान आहे. त्यामुळे मुलांची जबाबदारी केवळ आईची हा समज आपोआप कमी झाला. आइसलँड या देशाने समान कामासाठी समान वेतन हा कायदा कठोरपणे अंमलात आणला. न्यूझीलंडने राजकीय नेतृत्वात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवून आणला.
पाश्चात्त्य देशांमध्ये लिंगभेदाची समस्या पूर्णतः संपली असे म्हणता येणार नाही; परंतु ती कमी निश्चित झाली आहे. यासाठी वयाला अनुरूप लैंगिक शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे शरीर, भावना आणि परस्पर आदर याबाबत खुला संवाद निर्माण झाला. भारतीय घटनेनेही कलम 14 व 15 अन्वये लिंगभेद अमान्य केला आहे.

1908 मध्ये महिला कामगारांनी न्यूयार्कमध्ये समान हक्कासाठी लढा उभारला. त्यातूनच 1911 पासून आस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनीत महिला दिनाची सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्राने 8 मार्च 1975 ला महिला दिनाला मान्यता दिली. असा हा दीर्घ प्रवास आहे. त्यामुळे हा उत्सवाचा दिवस असावाच पण हक्काच्या लढयाची त्यामध्ये जाणीवही असावी.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारू या... आपल्या घरात, आपल्या वागण्यात, आपल्या शब्दांत समतेचा संदेश कितपत दिसतो? जर हा संदेश अजून अपुरा असेल, तर आजपासून त्याची सुरुवात करू या. मुलांच्या मनात आदर, संवेदनशीलता आणि समानतेची बीजे पेरू या. कारण आजची मुलेच उद्याचा समाज घडवणार आहेत. त्यामुळे लिंगभेद विरहित समाज घडविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे.
त्यामुळे आजचा महिला दिवस साजरा करताना स्वतःच्या स्वातंत्र्य समता आणि प्रगती सोबतच आपल्या घरातील मुलांना देखील या बदलाचे साक्षीदार बनविण्यासाठी स्वतः महिलांनी प्रयत्न करणे पुरुषांनी देखील ही बाब समजून घेणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.

चला तर ! घराघरातील मुलांना लिंग समानतेचा संदेश आपल्या वागण्यातून आणि संस्कारांतून देऊया. हीच खरी महिला दिनाची सार्थकता ठरेल.


0
25 views

Comment