logo

जिल्ह्यात 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*


नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्यातर्फे 14 मार्च 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे तसेच कौटूंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे ईत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅकांचे कर्ज वसुली प्रकरणे, थकीत पाणीबिल ईत्यादी प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरूद्ध अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. तरी सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांनी केले आहे.

तसेच सर्व पक्षकारांना कळविण्यात येते की, त्यांनी तडजोडीसाठी येताना आपले अधिकृत ओळखपत्र सोबत घेवून यावे. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा

0
130 views