logo

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात साजरा......


शेगाव - (बुलढाणा जिल्हा), जिल्ह्यातील शेगाव येथे नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने मूकनायक पत्रकार वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे तर स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे, लॉर्ड बुद्ध टीव्हीचे संचालक सचिन मून, ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर, प्रख्यात वकील राजेश झाल्टे, राष्ट्रीय संघटक दिनेश इखारे, राज्य संघटक पदमा मोहड, राज्य सदस्य विनोद सोनवणे, किरण उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी प्रस्ताविक केले. ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या परिस्थितीत पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. काही सत्ताधारी सरकारांची चाकरी करून पत्रकारितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. असे झाल्यास देशाचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगून त्यांनी पत्रकारांनी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडावी, असे आव्हान दिले.
यानंतर चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांना मनोरंजन केले. संदीप बडगे आणि रजनी भारसके यांनी देशभक्ती व समाज प्रबोधनात्मक गीते सादर केली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले. नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल खालील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले:

- आमदार राजकुमार बडोले (माजी सामाजिक न्यायमंत्री) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार
- सनदभाई पटेल – उत्कृष्ट उद्योगपती रत्न
- आमदार डॉ. संजय कुडे (माजी कामगार मंत्री) – उत्कृष्ट विकास रत्न
- अनिल मनोहर उंबरकर – उत्कृष्ट पत्रकारिता
- भूपेंद्र गणवीर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता
- मोहित देवानंद दामोदर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा समाजभूषण २०२५
- महेश बनसोडे – उत्कृष्ट प्रबोधनात्मक चित्रपट निर्मिती
- संदीप प्रल्हाद बडगे – समाज प्रबोधनात्मक उत्कृष्ट गायक
- सचिन मून – बहुजन समाज जनजागृती रत्न
- अतिशभाई द्वारका खराटे – समाजभूषण
- तुषार वाघुळदे – बेस्ट अँकरिंग

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी केले होते. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले, तर उपस्थित पत्रकार व मान्यवरांचे आभार राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी मानले.

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने सर्व सन्मानित व्यक्तींना हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!

20
2225 views