logo

कलमठ ग्रामपंचायतीचा स्वागतार्ह निर्णय तळकोकणाच्या जिल्ह्यातील तालुक्यातील सिंधुदुर्ग कणकवली.....


कलमठ ग्रामपंचायतीने पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौंदर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या अमानवी विधवा प्रथेला ठाम नकार देत एक ऐतिहासिक आणि समाजपरिवर्तनकारी स्वागतार्ह निर्णय घेतला. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधवा प्रथा म्हणजे पतीच्या निधनानंतर स्त्रीवर लादली जाणारी सामाजिक बंधने, तिच्या आयुष्याला काळ्या छायेत ढकलणारी प्रथा, मंगळसूत्र काढून घेणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, रंगीत कपडे न घालण्याची सक्ती, आनंदाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, असे अमानवी कुप्रकार आजही काही भागांत दिसून येतात. या प्रथेमुळे स्त्रीचे केवळ सौंदर्यच नव्हे, तर तिचा आत्मसन्मान, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक अस्तित्वही नाकारले जाते. कलमठ ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी यासंबंधी ठराव मांडला.

'महिला स्नेही गाव' या संकल्पनेवर आधारित काम करत असताना, विधवा प्रथा बंदीसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले. कोणत्याही सामाजिक प्रथेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असून, स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला. यापुढे कलमठ गावात विधवा प्रथा पूर्णतः बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करणार आहे.

73
2403 views