logo

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा*



*सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*


नांदेड, दि. 21 जानेवारी :
हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या धर्मरक्षण, त्याग व बलिदानाला भावपूर्ण उजाळा दिला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हात जोडून “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” हे गीत सादर केले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर”, “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आला आहे. या माध्यमातून गुरुंचा ऐतिहासिक त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी सहभागी शालेय विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. तसेच दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा एक भाग म्हणून हा सामूहिक गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हिंद दी चादर क्षेत्रीय समितीचे सह-अध्यक्ष कैलास खसावत, क्षेत्रीय समितीचे सह-सचिव तथा जागरण समितीचे सदस्य भगवान राठोड, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी तथा कार्यक्रमाचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, नोडल अधिकारी विजयकुमार पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, खालसा आयटीआयचे प्राचार्य गुरुबचन सिंग शिलेदार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सचखंड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या नकाशाच्या स्वरूपात उभे राहून सामूहिक गीत गायन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या सामूहिक गीत गायन कार्यक्रमात नांदेड शहरातील पिपल्स हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, खालसा हायस्कूल, खालसा आयटीआय, अशोक हायस्कूल, फेजुल उलूम हायस्कूल, केंब्रिज विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, राजश्री शाहू हायस्कूल, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, ज्ञानभारती विद्यामंदिर, नागार्जुना पब्लिक स्कूल, ग्यानमाता विद्याविहार, पिनॅकल इंटरनॅशनल, नारायणा इंटरनॅशनल, पोतदार इंटरनॅशनल, दशमेश ज्योत इंग्लिश स्कूल, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, आंध्र समिती हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल आदी शाळांतील जवळपास १० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

13
1077 views