
एक दोन नाही तर 'ही' व्यक्ती तब्ब्ल 238 निवडणुका हारली आहे! 'या' 'इलेक्शन किंग'ची नोंद लिम्का बुकमध्येही.....!
इतिहास सहसा जिंकणाऱ्यांच्या नावाने ओळखला जातो, पण तामिळनाडूतील एक व्यक्ती पराभवांच्या मालिकेमुळेच वेगळ्या प्रकारे इतिहासात नोंदली गेली आहे. मेट्टूर येथील के. पद्मराजन यांनी जिंकलेली एकही निवडणूक नसतानाही 'इलेक्शन किंग' अशी ओळख मिळवली आहे. पद्मराजन यांनी आतापर्यंत तब्बल २३८ निवडणुका लढवल्या असून प्रत्येक वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रपती पदापासून ते लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत त्यांनी प्रत्येक पातळीवर नशीब आजमावले. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते धर्मपुरी मतदारसंघातून २३९ व्यांदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
निवडणूक प्रवासाची सुरुवात
1988 साली त्यांनी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आज वयाच्या 65 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. 2011 च्या मेट्टूर विधानसभा निवडणुकीत त्यांना सर्वाधिक यश मिळाले, जेव्हा त्यांनी ६,२७३ मते मिळवली होती, मात्र तरीही विजय हुलकावणीच देऊन गेला.
लिम्का बुकमध्ये नाव
सततच्या पराभवांमुळेच पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये “भारतामधील सर्वाधिक वेळा निवडणूक हरलेला उमेदवार” म्हणून नोंदले गेले आहे. त्यांच्या निवडणूक प्रवासात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांच्याविरोधातही निवडणूक लढवली आहे.
खर्च आणि जिद्द
भारतामध्ये निवडणूक लढवताना उमेदवाराला अनामत रक्कम भरावी लागते, जी ठराविक टक्केवारीपेक्षा कमी मते मिळाल्यास जप्त होते. पद्मराजन यांच्या बाबतीत हे अनेकदा घडले असून, आतापर्यंत त्यांनी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम निवडणुकांवर खर्च केल्याचे सांगितले जाते.
साधा माणूस, मोठा संदेश
लोक अनेकदा त्यांची खिल्ली उडवतात, पण पद्मराजन यांचा उद्देश वेगळा आहे. “सामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो,” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने निवडणूक लढवत आहेत.
व्यवसायाने ते टायर दुरुस्तीचे काम करतात, तसेच होमिओपॅथिक उपचार देतात आणि स्थानिक माध्यमासाठी संपादक म्हणूनही काम करतात. पराभवांची संख्या कितीही वाढली तरी लोकशाहीवरील त्यांचा विश्वास मात्र आजही अढळ आहे.