logo

'कोमसाप'च्या वतीने 4 जानेवारी रोजी वाशी येथे रंगणार संगीत मैफल आणि कवीसंमेलन......


ज्येष्ठ पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार उद्घाटन; दिग्गजांची उपस्थिती.....

नवी मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), नवी मुंबई जिल्हा शाखा आणि सानपाडा जिल्हामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ जानेवारी रोजी एका दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'संगीत मैफल आणि कवीसंमेलन' या स्वरूपातील हा कार्यक्रम वाशी येथील गुरुज्ञाती हॉलमध्ये संपन्न होणार असून, साहित्यासोबतच सुरांच्या मेजवानीचा आस्वाद नवी मुंबईकर रसिकांना घेता येणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. प्रदीपजी ढवळ भूषवणार असून, ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमात कोमसापचे विश्वस्त अनुप कर्णिक, पंडित रघुवीर थत्ते, मोहनदास मुंगळे, डॉ. भास्कर दातावकर, प्रा. चंद्रकांत मढवी आणि कविवर्य अरुण म्हात्रे यांसारखे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार

आहेत. यावेळी होणाऱ्या कवीसंमेलनातून विविध विषयांवरील काव्यरचनांचे सादरीकरण होणार असून, संगीत मैफलीमुळे कार्यक्रमात अधिकच रंगत येणार आहे.

या उपक्रमासाठी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मोहन भोईर, सरचिटणीस फुलचंद्र भगत आणि खजिनदार लोमहर्ष भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगल देसाई, संतोष जाधव, सर्जेराव कुईगडे, सुनील म्हात्रे, शामसुंदर गावकर आणि मुकुंद महाले हे परिश्रम घेत आहेत. युवा प्रतिनिधी सायली जाधव आणि युवा शक्ती प्रमुख स्नेहा

वाघ यांनीही तरुण पिढीला या साहित्यिक चळवळीत जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबईतील सर्व रसिक आणि साहित्यिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन 'कोमसाप' परिवारातर्फे करण्यात आले आहे. गुरुज्ञाती हॉल, से. ०९, वाशी बस डेपो जवळ, नवी मुंबई, रविवार, ४ जानेवारी, दुपारी ३ ते सायंकाळी ७. दरम्यान संगीत मैफील आणि कवी संमेलन संपन्न होणार आहे.

32
1147 views