logo

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा



नांदेड, दि. २६ डिसेंबर : दिनांक २६ डिसेंबर हा दिवस श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या दोन लहान सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य, धैर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुलांमध्ये धैर्य, त्याग, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता तसेच सत्य, स्वाभिमान व न्यायाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. वयाला धैर्याचे बंधन नसते आणि मूल्यांसाठी जगणारेच खरे वीर असतात, ही प्रेरणा या दिवसातून मिळते.

या अनुषंगाने श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे शुक्रवार २६ डिसेंबर २०२५ रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास ॲड. अमरिकसिंघ वासरीकर, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा, क्रीडा प्रशिक्षक व सचिव वृषाली पाटील, पिनॅकल शाळेचे क्रीडा प्रशिक्षक साहेबराव शिंदे तसेच संस्थेचे प्राचार्य व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. विविध क्षेत्रात विशेष कौशल्य दाखवलेल्या कु. अवनी अविनाश कापसे, आर्यन लक्ष्मण मालेवार, अथर्व जोंधळे, स्वयंम मालू कांबळे, सानिध्य बळीराम अकोले व सूर्या सतीशकुमार पाटील या बालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज व त्यांच्या चार सुपुत्रांचा जीवनपरिचय तसेच त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यावर संस्थेतील शिल्प निदेशक सुरेंद्रसिंघ सुखमणी यांनी पीपीटीच्या माध्यमातून माहिती सादर केली.

मार्गदर्शन करताना ॲड. अमरिकसिंघ वासरीकर म्हणाले की, महान विभूतींच्या बलिदानामुळेच भारत देश घडला आहे. धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण अर्पण केले असून, त्यांचे स्मरण ठेवून आपल्या जीवनात सत्य, स्वाभिमान व न्यायाची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका एस. एम. (शि. नि.) यांनी केले. संस्थेचे प्रभारी गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी वीर बाल दिवसानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय मूल्ये व शौर्य शपथ दिली. सिलेदार डी. के. (शि. नि.) यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रेरणादायी गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

12
364 views