logo

पोलिसांचा हटके न्याय! जिथे गाड्या फोडल्या तिथेच आरोपींना फोडलं; पुणेकरांना ऐकवले आरोपींच्या विव्हळण्याचे आवाज....

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. कोयता गँगची दहशत सध्या वाढत जाताना दिसतेय. नुकतीच मिसरुड फुटलेली मुलंदेखील शहरात कोयता घेऊन दादागिरी करताना दिसतात. मात्र याच कोयता गँगची पुणे पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. 
काही दिवसांपूर्वी पुण्यात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याच कोयता टोळीतील आरोपींना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी या आरोपींना नागरिकांसमोरच चोप देत धिंड काढली आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांनी या आरोपींना गुडघ्यावर चालायला लावत धिंड काढली आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
इतकंच नव्हे तर, ज्या ठिकाणी या आरोपींनी वाहनांची तोडफोड केली होती. त्याच ठिकाणी आरोपींना पोलिसांनी शिक्षा दिली आहे. तिथल्याच नागरिकांसमोर या आरोपींना बेदम चोप दिला आहे. पोलिस आरोपींना धडा शिकवत असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी फुरसुंगी परिसरात 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गाड्या तोडफोड करतानाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. फुरसुंगी आदर्शनगर परिसरात कोयता टोळीने चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड केली होती. इतकंच नव्हे तर गाड्यांची तोडफोड करताना कोयता टोळीकडून घोषणाबाजीदेखील करण्यात येत होती. 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून या टोळक्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर पोलिसांनी कसून तपास करत या आरोपींना ताब्यात घेतला आहे. तसंच, नागरिकांच्या समोरच त्यांना शिक्षा करत धडा शिकवला आहे.

नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत

नाशिकच्या जेल रोड शिवाजीनगर येथे दोघा युवकांना बेदम मारहाण करत परिसरात दहशत माजविणाऱ्या तिघांसह दोघा अल्पवयीनांची कोयता गँगला नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून कोयते, तलवारीसह अन्य घातक हत्यारे जप्त करण्यात आलीये.
शिवाजीनगर येथे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सात ते आठ संशयितांनी तोंडाला मास्क लावून, म्हसोबा मंदिराजवळ हातात हत्यारे घेऊन, दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. तसेच भांडणाची कुरापत काढत विक्रेता धनंजय सागवान व त्याचा मित्र तेजस ऊर्फ विकी यांना मारहाण करत जबरी लूट करण्यात आली होती. गुन्ह्यातील हल्लेखोर आरोपी साईनाथनगर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तातडीने रिक्षामधून जात परिसरात सापळा रचत आरोपींना अटक केली आहे. 

125
3309 views