logo

भटक्या कुत्र्यांना वाटेल तिथे खावू घालणाऱ्यांना दणका; महाराष्ट्रात नवा नियम लागू.......

भटक्या कुत्र्यांकडून लहान मुले, नागरिकांवर होणारे हल्ले तसेच त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. यापुढे भटक्या कुत्र्यांना मोकळ्या जागेत खायला दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अशा कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण अनिवार्य केले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

भटक्या कुत्र्यांना खायला देण्याचा नवा नियम काय?

राज्य शासनाने सर्व महापालिका/नगरपालिका/नगर पंचायतींनी प्रत्येक नागरी भागात कुत्र्यांना पकडण्यासाठी नियमित मोहीम, त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच ज्या भागात कुत्र्यांचे पुनर्वसन किंवा सोडले जाईल तेथील संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांच्या खाण्याच्या जागा निश्चित करून त्याच ठिकाणी खायला देण्यात यावे. याची खातरजमा करण्यात यावी तसेच मोकळ्या ठिकाणी खायला देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

लसीचा पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश

जखमी होणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात उपचार सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयांमध्ये 'अँटी रेबीज' लस व 'इम्युनोग्लोब्युलिन'चा साठा अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सरकारी रुग्णालयांना पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर

महाराष्ट्रातील भटक्या कुत्र्यांची समस्या अत्यंत गंभीर आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक संख्या आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत ही समस्या वाढतच चालली आहे, विशेषतः शहरांमध्ये जसे मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे.

महाराष्ट्रात 100 जणांचा कुत्रा चावल्याने मृत्यू

महाराष्ट्रात 2022 ते 2024 या काळात 13.5 लाख कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या, जी देशातील सर्वाधिक आहे. 2019 ते 2023 या चार वर्षांत राज्यात 25 लाखांहून अधिक चावण्याच्या घटना घडल्या, ज्यात 100 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात 7 लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. 

मुंबईमधील आकडेवारी काय सांगते?

मुंबईत जानेवारी ते ऑगस्ट 2025 या आठ महिन्यांत 10,778 तक्रारी नोंदवल्या गेल्या. नागपूरमध्ये 2025 च्या पहिल्या सात महिन्यांत 6,056 चावण्याच्या घटना घडल्या, ज्यात 1,085 गंभीर जखमी झाले, आणि गेल्या चार वर्षांत 62% वाढ झाली. पुण्यात 2022 पासून 1 लाख चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. सांगली महापालिका क्षेत्रात 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत.

0
0 views