logo

हँडलवरुन हात काढल्यास थांबणार तुमची बाईक, केंद्र सरकारची दुचाकी उत्पादकांना सूचना......,

देशात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये दुचाकी चालकांची संख्या सर्वात मोठी आहे. 2023 मध्ये दुचाकी अपघातांत 77 हजार 539 लोकांचा मृत्यू झाला, जो एकूण रस्ते अपघात मृत्यूंच्या जवळपास 45 टक्के आहे. यापैकी केवळ दुचाकी चालकांच्याच बेदरकारपणामुळे 48 हजार 181 लोक मारले गेले. या अपघाती मृत्यूंमागे स्टंटबाजी, एका हाताने गाडी चालवणे आणि मोबाईलचा वापर ही मुख्य कारणे आहेत. पण आता सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केलीय. यासाठी एक नवे तंत्रज्ञान आणले जाऊ शकते. ज्यामुळे अशाप्रकारच्या अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

तंत्रज्ञानाचा आधार
वाहतूक पोलिसांचे दंड, जप्ती आणि कडक कारवाईनंतरही तरुणांमधला एक हाताने बाईक चालवण्याचा ट्रेंड थांबलेला नाही. अनेक तरुण रस्त्याने एका हाताने भरधाव बाईक पळवताना आणि रिल्स बनवताना दिसतात. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे आता केवळ शिक्षाच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने बेजबाबदार वर्तन थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हँडलबारवर सेन्सर बसवण्याचा प्रस्ताव
केंद्र सरकारने दुचाकी उत्पादकांना सूचना दिल्या आहेत की, दोन्ही हँडलबारवर टच किंवा प्रेशर सेन्सर बसवले जावेत.चालकाचे दोन्ही हात हँडलबारवर आहेत की नाहीत, हे सेन्सर सतत तपासतील. जर दोन्ही किंवा एक हात सलग 7-8 सेकंदांपेक्षा जास्त काळ हँडलबार सोडला तर बाईकचा स्पीड आपोआप कमी होऊ लागेल आणि गरज पडली तर बाईक पूर्ण थांबेलही.

स्टंटबाजीला लगाम
बाईक चालवताना मोबाईलवर बोलणे, सेल्फी काढणे किंवा रील बनवणे हा आजचा सर्वात मोठा धोका आहे. या सेन्सर यंत्रणेमुळे चालकाला दोन्ही हात हँडलबारवर ठेवावेच लागतील. परिणामी एका हाताने गाडी चालवण्याची सवय आणि त्यामुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा सरकारचा विश्वास आहे.

चर्चा अंतिम टप्प्यात
वाहतूक मंत्रालयाने याबाबत प्रमुख बाईक उत्पादक कंपन्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या आहेत. ही यंत्रणा सक्तीची करायची की स्वैच्छिक, किंमत किती वाढेल, तांत्रिक अडचणी काय यावर अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. पण मानवी चुकीला तंत्रज्ञानाने आळा घालण्याची वेळ आता आलीय, असे सरकारचे मत आहे.

प्रश्न: सरकार बाईकमध्ये नवीन कोणते सेन्सर बसवणार आहे?
उत्तर: सरकार दुचाकीच्या दोन्ही हँडलबारवर टच किंवा प्रेशर सेन्सर बसवण्याच्या सूचना देत आहे. हे सेन्सर सतत तपासतील की चालकाचे दोन्ही हात हँडलबारवर आहेत की नाहीत. जर एक किंवा दोन्ही हात सलग ७-८ सेकंदांपेक्षा जास्त काळ सोडले तर बाईकचा वेग आपोआप कमी होईल आणि गरज पडली तर बाईक थांबेलही.

प्रश्न: ही सेन्सर यंत्रणा फक्त स्टंटबाजी थांबवण्यासाठी आहे का?
उत्तर: नाही. मुख्य उद्देश हा आहे की बाईक चालवताना मोबाईलचा वापर, सेल्फी काढणे, रील बनवणे किंवा एका हाताने गाडी चालवणे अशा बेजबाबदार वर्तनांना आळा घालता यावा. स्टंटबाजीही त्यातच येते, पण सर्वात मोठी समस्या मोबाईलचा वापर आणि एकहात ड्रायव्हिंगची आहे, जी तरुणांमध्ये खूप वाढली आहे.

प्रश्न: ही यंत्रणा सक्तीची होणार की पर्यायी? नवीन बाईकच्या किंमतीत किती वाढ होईल?
उत्तर: सध्या तरी वाहतूक मंत्रालय आणि बाईक उत्पादक कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ही यंत्रणा सक्तीची करायची की स्वैच्छिक ठेवायची, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. किंमतीत किती वाढ होईल हेही निश्चित झालेलं नाही, पण सरकारचा प्रयत्न आहे की ही सुरक्षा यंत्रणा परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करावी. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल.

117
3189 views