logo

मा***', 'भो**', 'हरामी'अन्... हॉल तिकीटांवर छापल्या शिव्या! 'या' कॉलेजचे विद्यार्थी परीक्षेला मुकले; चंद्रकांत पाटलांनी...

महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळामध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात (Government Polytechnic, Bandra) एक धक्कादायक प्रकार घडला. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम नोंदणी अर्ज आणि हॉल तिकिटावर त्यांच्या नावाच्या जागी थेट शिव्या, आक्षेपार्ह शब्द आणि अपशब्द छापले गेले आहेत.

नेमकं काय घडलं?
महाविद्यालयाची मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (Management Information System) म्हणजेच एमआयएस यंत्रणेसंदर्भातील गोंधळामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. एमआयएस यंत्रणा हॅक झाल्याने किंवा डेटा एंट्रीत मोठी चूक झाल्याने हा गोंधळ झाल्याचं सांगितलं जातंय.

हॉल तिकीटांवर काय छापलंय?
त्यामुळे नावाच्या ठिकाणी 'मा***', 'भो**' असे घाणेरडे शब्द छापले गेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर तर 'हरामी', 'साला' असे शब्दही छापून आले आहेत.

विद्यार्थ्यांनी तक्रार केली पण...
नावांच्या ऐवजी शिव्या छापून आल्याची बाब लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यातच प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती, पण 'सोमवारपर्यंत दुरुस्त होईल' असं सांगून त्यांना परीक्षेला बसू दिलं गेलं. परीक्षेच्या दिवशीही समस्या जैसे थे राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देऊच दिली नाही. काहींना तात्पुरत्या हॉल तिकिटावर बसवण्यात आलं, पण बरेच जण परीक्षेपासून वंचित राहिले.

सामधानाकारक उत्तर नाही
विद्यार्थ्यांनी आमची काहीही चूक नसून आम्ही तक्रार केल्यानंतरही दुरुस्ती झाली नाही असं निदर्शनास आणून देत प्राचार्यांकडे याबाबतची तक्रार केली. पण समाधानकार उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

चंद्रकांत पाटीलांनी घेतली दखल
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्राचार्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. विद्यार्थ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हॅकिंगचा संशय असल्याने तपास सुरू आहे. एमआयएस प्रणाली तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
या साऱ्या गोंधळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिलं नाही त्यांचं नुकसान झालं आहे. आता थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने महाविद्यालयाकडून परीक्षेला बसू न दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी दिली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या ज्या एमआयएस यंत्रणेमुळे हा गोंधळ झाला ती यंत्रणा कशी आणि कोण हाताळतं, त्यामध्ये नेमकी काय गडबड झाली? यात हँकिंगचं काही कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

0
99 views