
माझ्या डोळ्यासमोर बिबट्याने मुलाला ओढत नेलं, तो रक्ताच्या गुळण्या करत होता; बापाने फोडला हंबरडा......
पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन विलास बोंबे याने जीव गमावला आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे कार्यालय आणि वाहन जाळलं आहे. हा त्या गावातील 20 दिवसांत झालेला दुसरा आणि जुन्नर विभागातील एप्रिलपासून पाचवा मृत्यू आहे. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिरूरमध्ये 5 वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावली. दरम्यान रोहनच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे.
झी 24 तासने रोहनच्या वडिलांशी संवाद साधला असता त्यांचे अश्रू थांबत नव्हते. ते वारंवार आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करत होते. बिबट्याने डोळ्यासमोर मुलाला शेतात ओढत नेलं. तो रक्ताच्या गुळण्या करत होता, त्याचे डोळे पांढरे पडले होते असं सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"मी भरपूर प्रयत्न केले. पण बिबट्याने सोडलं नाही. दोनदा माझ्यावर डरकाळी फोडून, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर बिबट्याने दोनदा त्याला तोंडाने ओढलं. मुलाच्या रक्ताच्या गुळण्या झाल्या, डोळे पांढरे झाले. माझ्या मुलाला ऊसाच्या शेतात आत ओढत नेलं. मला बिबट्या नको, मुलगा पाहिजे. मला न्याय पाहिजे, मला काही राजकारण नको," अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
"त्याची आजी रोज हाका मारते. मला फक्त न्याय पाहिजे. ज्यांना हवाय त्यांना बिबट्या द्या. आमच्या गावात अनेक बिबट्या आहेत, रोज एक हल्ला होतो. एकही अधिकारी येथे येत नाही आणि दखल घेत नाही. आमच्या घरातील ही तिसरी घटना आहे," असं त्यांनी सांगितलं आहे.
अजून किती वाट पाहायची. पहिलं मला पिंजऱ्यात ठेवा किंवा गाडीखाली टाका. माझी आता जगण्याची इच्छा नाही असंही त्यांनी हतबलपणे म्हटलं आहे.
बिबट्याला ठार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम गावामध्ये दाखल
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दहशत वाजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाली आहे. यानंतर बिबट्याला ठार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम गावामध्ये दाखल झाल्या आहेत. या बिबट्याचा शोध घेत या बिबट्याला ठार केलं जाणार असल्याचं जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून देत महामार्ग रोखून धरला आहे. यावरती भाष्य करताना शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या विषयाच कोणीही राजकारण न करता हा विषय काळजीपूर्वक आणि गांभीर्याने हाताळण्याची गरज असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कबूतरांच्या खाण्यासंबंधी बैठका घ्यायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांचे बिबट्यापासून जीव जात आहेत, याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यावर खासदार कोल्हे यांनी निशाना साधला आहे.