logo

'असा माणूस हवा जो मला प्रेग्नेंट करेल... मी 25 लाख देणार', आकर्षक ऑफर ऐकून पुण्यातील कंत्राटदार गेला अन्.....

  पुण्यात एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर 'प्रेग्नंट जॉब' अशी विचित्र जाहिरात पाहून एका कंत्राटदाराने आपले तब्बल 11 लाख रुपये गमावले आहेत. या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की एका महिलेला गर्भवती करण्याच्या बदल्यात त्या पुरुषाला २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर आली 'प्रेग्नंट जॉब' जाहिरात

बाणेर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या  कंत्राटदाराला 'प्रेग्नंट जॉब' नावाच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ आला. त्या व्हिडीओमध्ये एक महिला म्हणताना दिसत होती. “मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल. तो शिक्षित आहे की नाही, कोणत्या जातीचा आहे, गोरा की सावळा याचा मला फरक पडत नाही.” हा व्हिडीओ पाहून ठेकेदाराने त्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'प्रेग्नंट जॉब फर्म'चा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्याने कंत्राटदाराला सांगितले की, त्या महिलेसोबत राहण्यासाठी आणि करार पूर्ण करण्यासाठी रजिस्ट्रेशन व ओळखपत्र तयार करणे आवश्यक आहे.

विविध बहाण्यांनी 11 लाख रुपये उकळले

यानंतर काही दिवसांत ठेकेदाराकडून 'रजिस्ट्रेशन फी', 'आयडी फी', 'व्हेरिफिकेशन चार्ज', 'जीएसटी' अशा विविध कारणांवरून पैसे मागितले गेले. सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत एकूण ११ लाख रुपये या ठेकेदाराकडून ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले गेले. फसवणूक करणाऱ्यांनी दोन महिन्यांपर्यंत त्याला वेगवेगळ्या सबबी सांगून पैसे मागितले, धमकावले देखील. शेवटी जेव्हा ठेकेदाराने चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतर त्याला फसवणुकीचा अंदाज आला आणि त्याने लगेचच पोलिसांकडे धाव घेतली.

'प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'च्या नावाखाली देशभर फसवणूक

सायबर तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे स्कॅम भारतात 2022 पासून वाढले आहेत. या स्कॅममध्ये ठग सोशल मीडियावर 'प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'च्या नावाने व्हिडीओ जाहिराती चालवतात आणि पुरुषांना लाखोंच्या आमिषाने फसवतात. नंतर 'मेडिकल टेस्ट', 'लीगल प्रोसेस” किंवा 'सिक्युरिटी डिपॉझिट'च्या नावाने आणखी पैसे मागतात.
पैसे मिळताच हे ठग संपर्क तोडतात आणि गायब होतात. अशाच प्रकारच्या घटनांमध्ये बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तपासात असे स्पष्ट झाले आहे की ही फसवणूक एका मोठ्या सायबर नेटवर्कचा भाग आहे, जे सोशल मीडिया आणि बनावट व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना सापळ्यात ओढतात.

476
8875 views