logo

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चिया पीक* *प्रात्यक्षिक घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन*


नांदेड, दि. 28 ऑक्टोबर : मध्यम ते भारी जमीन, सुरुवातीच्या तीन प्रवाही सिंचनाच्या पाळ्या आणि नंतर दोन ते तीन तुषार सिंचन देण्याची सुविधा असलेल्या, सिंचन सुविधा असलेले शेतकरी यांनी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चिया पीक प्रात्यक्षिकासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यातत्वावर लाभार्थी निवड होणार आहे. तरी यासंधीचा त्वरीत लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
कृषी समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 3 हजार 125 एकर क्षेत्रावर चिया पीक प्रात्यक्षिक (3 हजार 200 रुपये प्रति एकर प्रमाणे) घेण्यात येणार आहेत. यामध्ये निविष्ठा बियाणे हे शेजारील जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी करावयाचे आहे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मोका पाहणी केल्यानंतर बियाण्याची रक्कम शेतकऱ्यांचे बँक खात्यावर डीबीटी पध्दतीने जमा करण्यात येईल.
तसेच इतर निविष्ठा (जैविक संघ,एकात्मिक अन्नद्रव्य/किड व्यवस्थापन, पिकाची माहिती पुस्तिका) कृषी विभागामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. निरोगी व पौष्टिक अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा चिया लागवडीकडे कल वाढत आहे. नवीन व पौष्टिक तेलबिया पिक प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना उच्च पौष्टिक मूल्य असलेल्या आणि बाजारात अधिक दर मिळविणाऱ्या पर्यायी पिकाची ओळख करून देणे हा आहे.
चिया पिकात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने, तंतू व खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा वापर आरोग्यदायी आहारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. हे पीक कोरडवाहू तसेच सिंचित परिस्थितीत अल्प कालावधीत तयार होते. शेजारच्या वाशिम जिल्ह्यामध्ये मागील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले तसेच नीमच मध्यप्रदेश येथे याची बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच वन्य प्राण्यापासुन या पिकास धोका नाही.
प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर चिया पिकाची लागवड करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि उत्पादनवाढीच्या उपायांची माहिती देण्यात येईल. तसेच बियाणे उत्पादनानंतर बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन दिले जाईल.
चिया पिकाच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा अधिक नफा मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून नावीन्यपूर्ण पिक नांदेड जिल्ह्यात अंतभुर्त करण्याचा कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे.
00000

20
533 views