logo

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहिर वाचन पंचनाम्यात चुक असेल तर दुरुस्ती केली जाणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील


(जिल्हा प्रतिनिधी - विकास वाघ धाराशिव)

अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे जाहीर ग्रामसभेत जाहीर वाचन केले जाणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती चुकीची नोंदविली गेली असेल तर त्यात वेळीच दुरुस्ती करता येणार आहे. पंचनामा म्हणजे पुरावा आहे. शासनाकडून मदत मिळताना हा पंचनामा सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी ग्रामसभेत जाहीर वाचन होत असताना प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीची आकडेवारी लक्षपूर्वक पाहून घ्या. क्षेत्र योग्य लागले आहे काय, जमीन खरवडून गेल्याची नोंद आहे काय? ड्रीप, पंपसेटचा उल्लेख करण्यात आला आहे काय? हे पाहून चुकीची माहिती तातडीने दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्याला भरीव मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य होईल असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे सोमवारी भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि मदत वाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार ठामपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. अडचण मोठी आहे. नुकसानही मोठे झाले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असा निसर्गाचा प्रकोप आपल्याला नेहमीच सहन करावा लागत आहे. तरीदेखील खचून न जाता आपण प्रत्येकवेळी उभारी घेतली आहेच. यावेळीही पुन्हा एकदा या संकटावर मात करून आपण ताठ मानेने उभे राहणार आहोत. अशावेळी आम्ही सगळे आणि आपले महायुती सरकार आपल्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाहीत हाच विश्वास आणि दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन दरेकर साहेब याठिकाणी आले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. प्रशासनाकडून सध्या पीक कापणी प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर आपले जातीने लक्ष आहे. वेळोवेळी त्याची इत्यंभूत माहिती आपण घेत आहोत. पिकविम्याच्या माध्यमातून हेक्टरी ३० हजार रुपयांपर्यंत मदत मिळावी असे आपले प्रयत्न सुरू आहे. असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.

शासकीय मदतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. कारण झालेले नुकसान आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. शासकीय अनुदान आणि मदत मिळाल्यानंतरही ज्यांचे नुकसान भरून निघणार नाही. अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले महायुती सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नांना हमखास यश मिळेल अशी आपणास खात्री असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईहून आपल्या कुटुंबीयांसह धाराशिव जिल्ह्यात येऊन आमदार दरेकर साहेबांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक बांधिलकीचे खरे उदाहरण त्यांनी दाखवून दिले. या संकटाच्या काळात शेतकरी बांधव एकटे नाहीत, त्यांच्या सोबत राज्य सरकार आणि सरकारमधील प्रत्येक घटक ठामपणे उभा आहे. आपल्या सरकारकडून जाहीर करण्यात आलेली सर्व मदत लवकरच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. गावातील पायाभूत सुविधांच्या कामाबाबत ग्रामसभा घेऊन ठराव करण्याबाबत सर्वांना आवर्जून सांगितले. ज्या कुटुंबांचे अतीव नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे त्यांना क्राउड फंडिंगच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, श्री.विकास कुलकर्णी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्यांनी पीकविमा भरलेला नाही त्यांनाही मिळणार मदत

जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के शेतकरी बांधवांनी यावर्षी पीकविमाच भरलेला नाही. अशावेळी त्यांनाही दिलासा मिळावा यासाठी आपले महायुती सरकार अत्यंत संवेदनशीलपणे विचार करीत आहे. पुढील टप्प्यात ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र ज्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून अशा सर्व शेतकरी बांधवांचे नुकसान भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र त्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा देण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

16
1751 views