
बुद्धिबळ स्पर्धेत देवांश लोखंडे व वैष्णव धसाळ यांची जिल्हास्तरीय निवड...
मुख्य संपादक :- सत्यम भोसले
क्रीडा व युवक संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्याामंदिर प्रशाला येथील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर यश संपादन करून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली.
तांभेरे येथील संत महिपती विद्यालयात उत्साहात पार पडल्या. तालुक्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत बिहाणी विद्यालयातील चि. देवांश भोलेनाथ लोखंडे (इयत्ता ९ वी) व चि. वैष्णव सुशीलकुमार धसाळ (इयत्ता ९ वी) या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचा व संयमाचा खेळ सादर करत तालुकास्तरावर विजयी ठरले.
यशस्वी कामगिरी मागे क्रीडा शिक्षक पंकज जगताप व मनोज सुपेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला योग्य दिशा देऊन त्यांनी हे यश मिळवले असल्याचे शालेय सूत्रांनी सांगितले.
यशस्वी व मार्गदर्शक शिक्षकांचे राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. प्रभावतीताई सतीश बिहाणी, संस्थेचे सचिव मनोज बिहाणी, सहसचिव अनुप बिहाणी , विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राहुल जगताप, ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब मोरे, बाबासाहेब गुंजाळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील हे विद्यार्थी उत्तम कामगिरी करून शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.