
मित्रांचा लोणावळा फिरायचा
जायला प्लॅन अखेरचा ठरला!
अपघातानंतर कारचा अक्षरशः
चेंदामेदा; 2 जागीच ठार....
पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांसाठी लोणावळ्याला फिरायला जाण्याचा प्लॅन जीवावर बेतला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दोघे जण जखमी झाले. सकाळी हे विद्यार्थी लोणावळाहून मारुती स्विफ्ट कारने परतत होते. सकाळी 5.45 च्या सुमारास पुण्यातील ईदगाह मैदानाजवळ कार एका उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला धडकली.
अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दिव्य राज सिंग राठोड (20) आणि सिद्धांत आनंद शेखर (20) यांचा जागीच मृत्यू झाला आणि हर्ष मिश्रा (21) आणि निहार तांबोळी (20) हे दोघे किरकोळ जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चारही बीबीए विद्यार्थी काल रात्री लोणावळा येथे गेले होते. सकाळी कॅम्पसमध्ये परतत असताना सुमारे 90 मिनिटांच्या अंतरावर हा अपघात झाला.
पोलिसांनी ट्रक चालक मनीष कुमार सूरज मणिपाल (39) याला ताब्यात घेतलं आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. घटनास्थळावरून आलेल्या दृश्यांमध्ये कार पूर्णपणे चेपलेली दिसत आहे. गाडीची एक बाजू समोरून चिरडली गेली होती आणि कारची चेसिस वळली होती.
नेमकं काय झालं?
मावळातील देहूरोड बायपास पुणे-बंगळुरु महामार्गावर पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्विफ्ट कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने सिद्धांत आनंद आणि दिव्यराज सिंह राठोड या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन विद्यार्थी जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री सिम्बॉयसिस कॉलेजचे हे चौघे विद्यार्थी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या प्रवासात काळाने दोन तरुणांचं आयुष्य संपलं. त्यामुळे पालक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे..घटनास्थळी देहूरोड वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत, जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.