logo

ट्रेनमध्ये फक्त एक साखळी ओढली की संपूर्ण ट्रेन कशी काय थांबते? सिस्टीमबद्दल जाणून वाटेल आश्चर्य.....

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक यंत्रणा बसवलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात परिचित म्हणजे इमर्जन्सी साखळी पुलिंग सिस्टम. आपण नेहमी पाहतो की डब्यांमध्ये खिडकीजवळ एक लोखंडी साखळी लटकलेली असते. या साखळीचे अनेक नियमही आहेत. फक्त आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत आपण याचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रवासी ती साखळी ओढतात आणि पूर्ण ट्रेन थांबते. पण नेमकं हे कसं होतं? यामागे काय सिस्टीम आहे? 

साखळी जोडलेली यंत्रणा

प्रत्येक डब्यातील साखळी ही ब्रेक पाइप नावाच्या मुख्य पाईपशी जोडलेली असते. हा ब्रेक पाइप संपूर्ण ट्रेनच्या सर्व डब्यांना आणि इंजिनला जोडतो. यामधून नेहमी हवेचा दाब (air pressure) कायम ठेवला जातो. हाच दाब ब्रेकिंग सिस्टीमला नियंत्रित करतो.

साखळी ओढली की काय घडतं?

जेव्हा प्रवासी साखळी ओढतो, तेव्हा ती एका वाल्व्हशी जोडलेली असते. साखळी ओढल्यावर वाल्व्ह उघडतो आणि ब्रेक पाइपमधील हवा बाहेर पडते.

हवा निघून गेल्यावर पाइपमधील एअर प्रेशर अचानक कमी होतो.

इंजिन ड्रायव्हरला लगेचच प्रेशर कमी झाल्याचा सिग्नल मिळतो.

दाब कमी होताच ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रेनच्या सर्व चाकांवर एअर ब्रेक्स सक्रिय होतात.

त्यामुळे पूर्ण ट्रेन थांबते.

सुरक्षिततेसाठी खास डिझाईन

रेल्वे ब्रेकिंग सिस्टम अशी डिझाईन केलेली आहे की, जर दाब कमी झाला तर ब्रेक आपोआप लागू होतात. म्हणजेच कुठे गळती झाली, पाईप तुटला किंवा साखळी ओढली गेली, तरीही ट्रेन आपोआप थांबते. ही यंत्रणा फेल-सेफ मेकॅनिझम म्हणून ओळखली जाते.

गैरवापर थांबवण्यासाठी नियम

बर्‍याच वेळा प्रवासी विनाकारण साखळी ओढतात. यामुळे ट्रेन उशिरा पोहोचते आणि प्रवासात अडथळा येतो. म्हणूनच रेलगाड्यांमध्ये साखळी ओढणं फक्त आपत्कालीन परिस्थितीतच परवानगी आहे. चुकीच्या वापरासाठी भारतीय रेल्वे कायद्यानुसार दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे.

कुठल्या वेळी वापरली जाते?

प्रवासी अचानक आजारी पडल्यास
डब्यात आग लागल्यास
एखादा प्रवासी चुकून खाली पडल्यास
गंभीर अपघात टाळण्यासाठी त्वरित ट्रेन थांबवायची असल्यास
फक्त एक साखळी ओढली की ट्रेन थांबते, यामागे एअर प्रेशर आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टमचा वैज्ञानिक मेकॅनिझम आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेली ही यंत्रणा खरी तर जीवन वाचवणारी ठरते. मात्र तिचा चुकीचा वापर टाळणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य आहे.

1
629 views