
धनगर समाजाला न्याय हवा – स्वतंत्र महामंडळाची तातडीची मागणी- प्रमोद वाघमोडे ,
अहिल्यादेवी होळकर संशोधन संस्था व आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ,
महाराष्ट्र शासनाने विविध समाजांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी अनेक स्वतंत्र संस्था व महामंडळे स्थापन केली आहेत. त्यामुळे त्या समाजांना शैक्षणिक संधी, आर्थिक बळकटी आणि सामाजिक उन्नती मिळत आहे.
परंतु, लक्षणीय लोकसंख्या असूनही धनगर समाज अजूनही उपेक्षित आहे. त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र संस्था वा महामंडळ आजवर स्थापन झालेले नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
समाजाच्या भावनांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था” तसेच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळ” तातडीने स्थापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने केली आहे.
समाजाचे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत :
धनगरांना स्वतंत्र संस्था का नाही?
त्यांच्या वाट्याचा निधी खरंच कुठे खर्च होतो?
अर्ज भरताना इतक्या तांत्रिक अडचणी का येतात?
आमचं प्रतिनिधित्व शासनात नेमकं कुठं आहे?
शतकानुशतकं मेहनत करणारा समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. ही अन्यायकारक स्थिती बदलणे ही काळाची गरज आहे. शासनाने समाजाच्या या वेदनेला समजून तातडीने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.