
महाराष्ट्रातील प्रसिद्ध
पर्यटनस्थळावर भयानक गर्दी !
पर्यटक रस्त्यात वाहने सोडून
पायी चालत निघाले......
लाँग विकेंडमुळे पर्यटक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर भयानक गर्दी झाली आहे. पर्यटक रस्त्यात वाहने सोडून पायी चालत निघाले आहेत. या ठिकाणी वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. भयानक गर्दीमुळे माथेरानला आलेले पर्यटक हैराण झाले आहेत. नेरळ माथेरान मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दस्तुरी ते जुम्मापट्टी स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनतळावर जागा नसल्याने पर्यटकांची वाहने रस्त्यात उभी केली आहेत. माथेरान घाट रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आहे. सलग सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माथेरान मध्ये तोबा गर्दी झाली आहे. एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आहे. वाहतूक कोंडी बरोबरच पडणाऱ्या पावसाने पर्यटकांच्या त्रासात भर घातली आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. प्रामुख्यानं लोणावळा आणि खंडाळा भागांमध्ये येणारी पर्यटकांची गर्दी पाहता गुगल मॅपवर ही या मार्गावर संपूर्ण रेड पट्टा पहायला मिळाला. लोणावळ्यातही पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे भरधान वेगात दुचाकी चालवण-यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी कारवाई केली.
लोणावळ्याचा पावसाळी निसर्ग, डोंगरावर पसरलेली गार हिरवाई, फेसाळलेले धबधबे आणि थंडगार आल्हाददायक वारा याचा आनंद घेण्यासाठी लॉंग वीकेंडमध्ये पर्यटकांची पाऊले लोणावळ्यात वळू लागली असून, लोणावळा शहरात गर्दी वाढू लागलीये .स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमीच्या सलग सुट्ट्यांमुळे हॉटेल्स, रिसॉर्ट आणि चिक्की दुकाने पर्यटकांनी गच्च भरली आहेत. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसारख्या लोकप्रिय ठिकाणी उत्साही वर्दळ दिसत आहे. सध्या पावसाच्या सरींनी पुन्हा हजेरी लावली आहे. स्थानिक चिक्की व्यापारालाही जोरदार चालना मिळत आहे. दुसरीकडे हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.. पर्यटकांनी सुट्ट्यांचा आनंद घ्यावा, मात्र गोंधळ घालू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय.