
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारकडून अखेर मुदतवाढ, आता पुढची तारीख....
राज्य परिवहन विभागाने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (HSRP) दिलेली मुदत पुन्हा वाढवली आहे. 15 ऑगस्ट रोजी मुदत संपत असतानाच राज्य सरकारने मुदतवाढ देत लाखो वाहनधारकांना दिलासा दिला आहे. ही मुदत आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. याआधी 15 ऑगस्टला मुदत संपत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते, संस्थांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
एचएसआपी (HSRP) साठी नवी मुदतवाढ कधीपर्यंत?
राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबत आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असंही शैलेश कामत यांनी स्पष्ट केलं आहे.
जयंत पाटील यांनी काय विनंती केली होती?
"राज्यात हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट, 2025 रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर 10 हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी," अशी विनंती त्यांनी केली होती.
"वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70 टक्के जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, शासनाने मुदतवाढ देण्याची गरज आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.
HSRP कोणाला बंधनकारक आहे?
1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक आहे. यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, व्यावसायिक, खासगी सर्व वाहनांचा समावेश आहे. 2019 नंतरच्या वाहनांना आधीच या प्लेट्स लावण्यात आल्या असल्याने त्यांना याची गरज नाही.
HSRP साठी नोंदणी कशी करायची?
- www.transport.maharashtra.gov.in किंवा www.bookmyhsrp.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करा
- तुमच्या वाहनाच्या रजिस्ट्रेशननुसार, योग्य RTO कोड निवडा
- वाहनाची माहिती भरा ज्यामध्ये नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाका
- जवळच्या फिटमेंट सेंटरवर तारीख आणि वेळ निवडा
- तुम्हाला जी तारीख दिली जाईल त्या तारखेला फिटमेंट सेंटवर आपलं वाहन घेऊन जा
- वाहनाप्रमाणे तुमच्याकडून फी आकारली जाईल.
एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेट कशासाठी लावतात?
1) वाहनांची सुरक्षित ओळख
एचएसआरपी नंबर प्लेट्समध्ये विशेष वैशिष्ट्ये असतात, जसे की युनिक सीरियल नंबर, क्रोमियम-आधारित होलोग्राम, आणि टॅम्पर-प्रूफ डिझाइन. यामुळे वाहनांची ओळख निश्चित करणं सोपं होतं आणि बनावट नंबर प्लेट्सचा वापर रोखला जातो.
2) वाहन चोरी आणि गुन्हेगारी रोखणे:
या प्लेट्समुळे वाहन चोरी, बनावट कागदपत्रांचा वापर, आणि इतर गुन्हेगारी कृत्यांना आळा बसतो. कारण या प्लेट्स सहजपणे कॉपी करता येत नाहीत आणि त्यांच्यावर युनिक कोड असतो जो वाहनाच्या मालकाशी आणि आरटीओ डेटाबेसशी जोडलेला असतो.
3) वाहनांचा डेटा ट्रॅकिंग
एचएसआरपी प्लेट्समुळे वाहनांचा डेटा डिजिटल पद्धतीने ट्रॅक करणं शक्य होतं. यामुळे वाहनाची माहिती, मालकाची ओळख, आणि रजिस्ट्रेशन तपशील त्वरित तपासता येतात.
4) वाहनांच्या रजिस्ट्रेशनची एकसमानता:
एचएसआरपीमुळे देशभरात वाहन नोंदणी प्रक्रियेत एकसमानता येते. या प्लेट्स सर्व राज्यांमध्ये समान डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह उपलब्ध असतात, ज्यामुळे आंतरराज्यीय वाहन हालचालींवर देखरेख ठेवणं सोपं होतं.
5) टॅम्पर-प्रूफ आणि टिकाऊपणा:
एचएसआरपी प्लेट्स अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात आणि त्या टॅम्पर-प्रूफ असतात. तसेच, त्यांच्यावर रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म आणि 'IND' होलोग्राम असतो, ज्यामुळे त्या टिकाऊ आणि सुरक्षित असतात.
एचएसआरपीचे वैशिष्ट्ये काय आहेत?
- युनिक सीरियल नंबर: प्रत्येक प्लेटवर १०-अंकी युनिक नंबर असतो.
- क्रोमियम होलोग्राम: बनावट प्लेट्स ओळखण्यासाठी भारताचा चक्र लोगो असलेला होलोग्राम.
- स्नॅप लॉक: प्लेट एकदा लावल्यानंतर ती काढणं कठीण असतं.
- रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म: रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढवते.
- 'IND' चिन्ह: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख दर्शवते.