
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील दसरा पादर गोरजाबारी ते खाई दरम्यान असलेल्या रस्त्यावर दरवर्षी दरडी कोसळून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होत असतो. तरी त्वरित रस्त्याची दुरुस्ती व प्रशासनाकडून कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम करण्यात यावे अशी मागणी नागेशकुमार पाडवी यानी केली आहे.
अक्कलकुवा प्रतिनिधी:( गंगाराम वसावे)
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील दसरा पादर गोरजाबारी ते खाई दरम्यान असलेल्या रस्त्यावर दरवर्षी दरडी कोसळून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होत असतो.
मात्र या मार्गांकडे कोणी अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे संबंधित या परिसरातील नागरिक आपली वाहने चालविण्यासाठी स्वतः दरडी साफ करून प्रवास करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी यांचे सर्वेक्षण देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात नाही व लोकांच्या अडचणीही लक्षात घेतल्या जात नाहीत. फक्त रस्ता तयार करून देणे एवढीच जबाबदारी संबंधित विभागाची असते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा मार्ग पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला होता. मात्र अलिकडे काही वर्षानंतर याचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आले. मात्र या विभागाने कधीही याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केला असून त्वरित रस्त्याची दुरुस्ती व प्रशासनाकडून कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील अनेक घाटात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू असतात. अनेक दिवस पर्यंत दरडी कोसळून दगड गोटे रस्त्यावर येतात व वाहतुकीला तो मार्ग बंद पडत असतो. मात्र तरी देखील संबंधित प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. यासाठी प्रत्येक घाटाच्या ठिकाणी संबंधित विभागाने जेसीबी लावून तो मार्ग मोकळा करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. परंतु ही जबाबदारी पार पाडली जात नसल्यामुळे या परिसरातील त्रस्त नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.