logo

Uddhav Thackeray : राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत, आता तरी..”; शिंदे सेनेतल्या बड्या नेत्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. तेव्हापासून ते महापालिका निवडणुकीत एकत्र येतील अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान शिवसेनेतल्या नेत्याने या दोघांवरही बोचरी टीका केली आहे.

Uddhav Thackeray : राज ठाकरेंशी युती करायची असेल तर आम्ही खुलेपणाने करु, चोरुन मारुन काहीही करणार नाही असं म्हणत सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंशी युतीचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेतल्या एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरे हे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत अशी बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीने डिवचलं आहे.

उद्धव ठाकरे मनसेच्या युतीबाबत काय म्हणाले?

मनसेशी युतीबाबत तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली का? लोकांचा रेटा आहे की तुम्ही ( राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राजकीय दृष्ट्या एकत्र यावं, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठीक आहे, आता २० वर्षांनी एकत्र आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असाही त्याचा भाग नाही. पण मी जे काही म्हटलं की मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी आस्मितेसाठी जे-जे करण्याची गरज आहे, ते-ते करण्याची माझी तयारी आहे”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत केलं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर रामदास कदम यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
“एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतो आहे. हे काय बिहार आहे का? वाट्टेल ते पंतप्रधानांबाबत बोलायचं, गृहमंत्र्यांबाबत बोलायचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलायचं, नको नको ते शब्द एकनाथ शिंदेंना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावर साकडं घालायचं की मला वाचवा आणि मुलाला वाचवा. दिशा सालियन प्रकरणातून त्याला बाहेर काढा. उद्धवजी तु्म्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही सगळ्यांना ते दिसतं. मला अनेक गोष्टी माहीत आहे. कशा पद्धतीने क्लिन चिट मिळाली ते माहिती आहे. मी न्यायालयावर काही बोलणार नाही. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं आहे. आता आम्हाला भाजपासोबत घ्या आणि एकनाथ शिंदेंना बाजूला करा मग मी येतो अशा अटी टाकल्या जात आहेत.” असं रामदास कदम म्हणाले.

राज ठाकरेंपुढे भिकेचा कटोरा घेऊन उद्धव ठाकरे उभे आहेत
राज ठाकरे अजून कुठे काय बोलले आहेत? राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. बाबा तू माझ्यासोबत ये सांगत आहेत. मुंबईत मराठी माणसं शिल्लक आहेत किती? मुंबईतल्या मराठी माणसाला संपवलं कुणी? विरार, नालासोपारा या ठिकाणी घालवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषेला देशाच्या पंतप्रधानांनी अभिजात दर्जा दिला त्यांच्याबाबत एक तरी चांगला शब्द बोला. महापालिका आपल्या घशात घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चालला आहे याला मुंबईची जनता भीक घालणार नाही असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.





17
1450 views