logo

काल दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला ठाकरेंचा नेता आज भाजपात; राऊत म्हणाले, 'क्लायमॅक्स असा की.......

Nashik Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरुच आहे. असं असतानाच नाशिकमधून अशाच इन्कमिंगसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कालच दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला ठाकरेंच्या शिवसेनेचा नेता आज भाजपामध्ये प्रवेश करत आहे. ही बातमी समोर आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

काल गुन्हा दाखल आज भाजपामध्ये

ठाकरे शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव सुनील बागुल यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजेच कालच सुनील बागुल यांच्या विरोधात नाशिकमध्ये दरोड्याच्या गुन्हा दाखल झाला होता. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही फटका

ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार गटातूनही माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गणेश गीते हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे गेल्या विधानसभेचे नाशिक पूर्व मतदार संघातील उमेदवार राहिले होते. गणेश गीते यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजेच आज भाजपामध्ये एकूण 3 नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. 

राऊत म्हणतात, 'क्लायमॅक्स असा की...'

याच पक्ष प्रवेशावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. "भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळेजण फरार झाले," असं राऊत म्हणालेत. या पोस्टमध्ये पुढे राऊतांनी, "क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!" असा टोमणा मारला आहे.

मुंबईत होणार पक्षप्रवेश

आज सकाळी साडेदहा वाजता मुंबई प्रदेश कार्यालयात हे पक्षप्रवेश होणार आहेत. सुनील बागुल यांच्या प्रवेशाने ठाकरे सेनेला मोठा धक्का बसणार आहे. तर गणेश गीते यांच्या घरवपासनीमुळे भाजपचं बळ वाढणार आहे. 

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी

भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे:
1) सुनिल बागुल (शिवसेना उपनेते, उबाठा)
2) मामा राजवाड़े (महानगर प्रमुख, उबाठा)
3) गणेश गीते (माजी स्थायी समिति सभापती)
4) सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, उबाठा)
5) प्रशांत दिवे (माजी नागरसेवक, उबाठा)
6) सिमा ताजने (माजी नगरसेविका,उबाठा)
7) कमलेश बोडके (माजी नगरसेवक)
8) बाळासाहेब पाठक (जिल्हा संघटक, उबाठा)
9) गुलाब भोये (उपजिल्हा प्रमुख, उबाठा)
10) कन्नु ताजने (उपजिल्हा प्रमुख, उबाठा)
11) शंभु बागुल (युवसेना विस्तारक, उबाठा)
12) अजय बागुल (श्रमिक सेना जिल्हा प्रमुख)

112
5312 views