logo

रुग्णालयातच तरुणीला जमिनीवर पाडून छातीवर बसला अन् नंतर...; मदत सोडून डॉक्टर व्हिडीओ काढत राहिले......

मध्य प्रदेशात लोकांची आणि रुग्णालयातील सुरक्षा किती वाऱ्यावर आहे हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 27 जून रोजी नरसिंहपूरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयात 12 वीची विद्यार्थिनी असलेल्या 19 वर्षीय संध्या चौधरीची तिच्यावर एकतर्फी प्रेम कऱणाऱ्या तरुणाने हत्या केली. सार्वजनिक ठिकाणी ही हत्या होत असताना आणि कोणीही हस्तक्षेप केला नाही.

या हत्येचं अंगावर काटा आणणारं फुटेज व्हायरल झालं आहे. यामध्ये आरोपी अभिषेक कोष्टी मुलीचा गळा कापत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह सर्वजण फक्त उभे राहून पाहत होते. मुलगी रुग्णलायतल्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना काहीजण तर शेजारुन जात होते. म्हणजे, ज्या ठिकाणी तरुणीवर उपचार होणं अपेक्षित होतं, ती जागा हत्येचं ठिकाण ठरली.

व्हिडीओत दिसत आहे की, आरोपी अभिषेक आधी संध्याच्या कानाखाली मारतो. यानंतर तिला खाली जमिनीवर पाडतो. नंतर तिच्या छातीवर बसतो आणि धारदार चाकूने गळा कापतो.

हे सर्व दिवसाढवळ्या एमर्जन्सी विंगसमोर घडलं. म्हणजेच डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांपासून काही मीटर अतंरावर हा हत्याकांड घडला. जवळपास 10 मिनिटं हा सगळा प्रकार सुरु होता. यानंतर आरोपीने स्वत:चा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर पळ काढला आणि बाहेर असलेली बाईक घेऊन पळ काढला.

हत्या झाली तेव्हा दोन सुरक्षारक्षकांची ट्रॉमा सेंटरच्या बाहेर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान आतमध्ये रुग्णालयातील अनेक कर्मचारी होते ज्यात डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय होते. पण यापैकी कुणीही हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

सुरक्षेत असलेल्या या त्रुटीमुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हादरले आहेत. 11 रुग्ण ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल होते, ज्यामधील आठ जणांनी त्याच दिवशी डिस्चार्ज घेतला. तसंच इतरांनी दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेतला.

संध्या त्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. प्रसूती वॉर्डमध्ये एका मैत्रिणीच्या वहिनीला भेटायला जात असल्याचं तिने सांगितलं होतं. अभिषेक कोष्टी दुपारपासून रुग्णालयात तिची वाट पाहत होता असं सांगितलं जात आहे. हत्या होण्याआधी खोली क्रमांक 22 च्या बाहेर दोघांमध्ये मोठं भांडण झालं. हल्ल्यानंतर संध्याचा जागीच मृत्यू झाला.

मुलीच्या कुटुंबाला दुपारी 3.30 च्या सुमारास कळवण्यात आलं. ते रुग्णालयात पोहोचले तोपर्यंत तिचा मृतदेह तिथेट पडला होता. संतप्त झालेल्या कुटुंबाने रुग्णालयाबाहेर रस्ता रोखला. रात्री 10.30 वाजेपर्यंत निदर्शन सुरु होतं. परंतु पहाटे 2 वाजेपर्यंत पुन्हा निदर्शन सुरु झालं. अधिकाऱ्यांनी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

242
6489 views