logo

तुमचा दुपारचा डबा महागला! मुंबईच्या डबेवाल्यांनी किती केली दरवाढ......?

डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात तुळशीमाळ, पांढरा लेंगा आणि सदरा असं वर्णन केलं तर क्षणातच मुंबईचा डब्बेवाला डोळ्यासमोर उभा राहतो. वेळेचं भान ठेवत अचूक ठिकाणी डब्बे पोहोचवणं, हा मुंबईच्या डब्बेवाल्यांचा हातखंडा. मुंबईच्या सामाजिक आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग. सध्याच्या महागाईचा त्यांनाही फटका बसलाय. त्यामुळे त्यांनी सेवाशुल्कात वाढ केलीय. 
मुंबईत डबेवाल्यांची सेवा महागली
सेवा शुल्क 200 रूपयानं वाढवलं
महागाईमुळे डबेवाला असोसिएशनचा निर्णय
मुंबईकरांना दुपारचं जेवण मिळतं ते मुंबईच्या डबेवाल्यांमुळे. मराठमोळ्या पोशाखातला हा डबेवाला सर्वांच्या कुतुहलाचा विषय. गेल्या 135 वर्षांपासून मुंबई डबेवाला ही सेवा सुरू आहे. मात्र आता या डबेवाल्यांना महागाईचे चटके बसू लागलेत. परिणामी, डबे पोहोचवण्याच्या शुल्कात असोसिएशन वाढ केलीय. प्रत्येक डब्यामागे मासिक शुल्क दोनशे रूपयांनी वाढवलंय. काही दिवसांपूर्वी बेस्ट बस आणि रिक्षांची दरवाढ झाली. तसंच वाढती महागाई आणि प्रवासातली वाढती जोखीम या दोन प्रमुख कारणांमुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं असोसिएशननं सांगितलंय. पाच किलोमीटरच्या आत डबा पोहोचवण्यासाठी आता 1400 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. त्याहून जास्त अंतरासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे.  

कशी असणार दरवाढ?

या दरवाढीमुळे, आता डबा घेण्याच्या ठिकाणापासून ते कार्यालय पाच किलोमीटर अंतरावर असल्यास, जुन्या दरानुसार आकारले जाणारे मासिक शुल्क 1200 होते. आता ते वाढून 1400 रुपये करण्यात आले आहे. तर पाच किलोमीटरच्या पुढे सेवा द्यायची असल्यास, डबेवाल्यांच्या आवश्यकतेनुसार पूर्वीप्रमाणेच प्रत्येकी 300 ते 400 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
मुंबईत काम करणा-या या डबेवाल्यांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाची परंपरा आजही जपलीय. येत्या 6 जुलै रविवार आणि आषाढी एकादशीची शासकीय सुट्टी आहे, त्यादिवशी डबेवाले पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेतील. त्यामुळे 7 जुलैला मुंबईत डबेसेवा बंद असेल, 8 जुलै मंगळवार डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर होतील, असे सुभाष तळेकर यांनी म्हटलंं.
मुंबईचा डबेवाला, त्यांचं व्यवस्थापन आणि वक्तशीरपणाचं कायम कौतुक होतं. मुंबईच्या संस्कृतीतही मुंबईच्या डबेवाल्यांना महत्त्व आहे. कायम ग्राहकांच्या सेवेचं व्रत घेतलेल्या या डबेवाल्यांना कोरोनापासून काही अडचणींना सामोरं जावं लागलं. आता काहींचं घरातून कामं सुरू आहेत. त्यात स्विगी, झोमॅटोसारख्या खाद्यपदार्थ पुरवणा-या कंपन्यांमुळेही मुंबईच्या डबेवाल्यांसमोरच्या समस्या वाढल्या. पण या संकटकाळात आपल्या कामाचं महत्त्व आणि निष्ठा जाणून ग्राहक आमच्या पाठीशी राहतील. असा विश्वास या मुंबईच्या डबेवाल्यांना आहे.  

63
1952 views