logo

कल्याण हादरलं! इंडोनेशियातील School Trip दरम्यान शिक्षिकेचा बोट अपघातात मृत्यू; रिव्हर राफ्टींग.......

 इंडोनेशियामधील बाली शहरात झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये कल्याणमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मयत महिला ही कल्याणमधील नामांकित शाळेतील शिक्षिका असल्याची माहिती समोर येत आहे. शैक्षणिक सहलीसाठी त्या विद्यार्थ्यांसोबत इंडोनेशियामधील बाली येथे गेल्या होत्या. 
नातेवाईक बालीला रवाना

शैक्षणिक सहल घेऊन गेलेल्या कल्याणच्या शाळेतील शिक्षिका श्वेता पाठक यांचा रिव्हर राफ्टींगदरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाला. बोट उलटल्याने श्वेता यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पाठक यांचे नातेवाईक आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी बाली येथे रवाना झाले असून त्यांच्या नातेवाईकांनी परदेश मंत्रालयाला श्वेता यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. 

रिव्हर राफ्टींग करताना बोटीचा अपघात

कल्याणमधील नामांकित शाळेपैकी एक असलेल्या बिर्ला शाळेची सहल इंडोनेशियामधील बाली इथे गेली होती. 9 मे रोजी रिव्हर राफ्टींग करताना श्वेता प्रवास करत असलेली बोट बुडाली. दरम्यान, या दुर्घटनेत श्वेता यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाचे कर्मचारी बालीला रवाना झालेत.

सुप्रिया सुळेंनी केलं आवाहन

श्वेता यांचा मृतदेह बालीमधील गैण्यार शहरातील पायांगण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. श्वेता यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना ट्वीट करत मदतीचे आवाहन केले आहे.

दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात

बालीमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचा रिप्लाय सुप्रिया सुळेंच्या ट्वीटला भारतीय दूतावासाच्या खात्यावरुन करण्यात आला आहे. लवकरच श्वेता यांचं पार्थिव मायदेशी आणलं जाईल असं सांगण्यात येत आहे.

185
5049 views