logo

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वयाच्या 60 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात, पक्षातील सहकाऱ्याशीच केलं लग्न......

पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वयाच्या 60 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विवाहसोहळ्यात आपल्याच पक्षाच्या सहकारी रिंकू मजुमदार यांच्याशी लग्नगाठ बांधली. पारंपारिक बंगाली लग्नाच्या पोशाखात आणि डोक्यावर 'टोपोर' घालून, दिलीप घोष त्यांच्या पत्नीसह विधींनंतर पत्रकारांसमोर आले होते. 
"मी सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार मानतो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही आभार मानतो, ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही," असं त्यांनी कोलकाताजवळील न्यू टाउन येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. 
दिलीप घोष यांनी आपण आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न केल्याचं सांगितलं आहे. दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. मात्र रिंकू मजुमदार यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांनी पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. 
दिलीप घोष तरुणपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत आणि 2015 मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी देशभरात विविध भूमिका बजावल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना बाजूला सारत भाजपला मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थापित करण्याचं श्रेय दिलं जातं.
2021 मध्ये इको पार्कमध्ये मॉर्निक वॉकला गेले असता दिलीप घोष आणि रिंकू मजुमदार यांची भेट झाली होती. कालांतराने हे नातं अधिकच दृढ झाले, असे त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ईडन गार्डन्स येथे झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान त्यांनी नातेसंबंध औपचारिक करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं. 
वधूच्या बाजूने लग्नाचा प्रस्ताव आला होता. "सुरुवातीला ते उत्सुक नव्हते, तरी त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे," असं ५१ वर्षीय मजुमदार म्हणाल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते घोष यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घोष यांना दोन पुष्पगुच्छ आणि एक पत्र पाठवून त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
तथापि, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे मौन सर्वांचं लक्ष वेधणारं होतं. लग्नाबद्दल विचारलं असता त्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला "मी त्यावर भाष्य करणार नाही", असं सांगितलं. 
लग्नाचे सर्व विधी वैदिक परंपरेनुसार पार पडल्याचं समजत आहे. या लग्नात फक्त जोडप्याचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. घोष म्हणाले की, शनिवारी ते खरगपूरला भेट देतील, ज्याचं त्यांनी 2019 ते 2024 पर्यंत लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. ते दमदुम येथे एका राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. हनिमून प्लॅनबद्दल विचारले असता ते म्हणाले, "हे देशात कुठेतरी घडेल", असं उत्तर त्यांनी दिलं.

220
7494 views