logo

महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून नेणाऱ्या दोन चोरट्यांच्या पर जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या गुन्हे आले उघडकीस

शिरूर.( दिलीप शेलार )
शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

शिरूर : रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दूचाकीवरून धूम ठोकणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले. या प्रकरणात आणखी एका चोरट्याचा सुगावा लागला असून, या तिघांच्या टोळीने शिरूर तालुक्यात अशा प्रकारे सोनसाखळी हिसकावण्याचे पाच गुन्हे केले असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.
गणेश सुनील गायकवाड (वय २१, रा. सारसनगर, सोलापूर रोड, अहिल्यानगर) व करण नरसी वाघेला (वय २४, रा. संजय नगर, काटवन खंडोबा, स्टेशन रोड, अहिल्यानगर) अशी या सोनसाखळी चोरांची नावे असून, त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला. साजीद सलिम शेख (रा. अहिल्यानगर) याच्या सोबतीने शिरूर तालुक्यात पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली त्यांनी दिली असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
२६ जानेवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जोशीवाडी परिसरातील फिर्यादी महिला गावातून जाणाऱ्या पुणे - नगर रस्त्याने हनुमान मंदिरासमोरून घराकडे जात असताना दूचाकीहून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जात त्यांच्या गळ्यातील सुमारे तीस हजार रूपये किंमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावले आणि दूचाकीवरून धुम ठोकली याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकेबंदी करीत परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान, शिरूर परिसरात सोनसाखळी हिसकावण्याचे आणखीही प्रकार घडल्याने शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब शिंदे, पोलिस अंमलदार नीतेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, सचिन भोई, रवींद्र आव्हाड, निखिल रावडे, अजय पाटील या पथकाने पुढील काही दिवस संशयित चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सीसीटीव्ही फूटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात आला व त्यातून चोरटे हे अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पथकाने सापळा रचत रात्रीचे दोघांना जेरबंद केले. या गुन्ह्यात साजीद शेख याचाही सहभाग असून, या तिघांच्या टोळीने शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीबरोबरच आसपासच्या परिसरातही अशा प्रकारचे आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिरूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

रस्त्याने येत जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेले किंवा नेत असेल चोरट्यांकडून दमदाटीचा, सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा महिला भगिनींनी शिरूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन.
संदेश केंजळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन यांनी केले.

4
543 views
  
2 shares