logo

मासिक पाळी आल्यानं विद्यार्थिनीला मुख्यध्यापिकेनेच वर्गाबाहेर काढले.......

तामिळनाडूतील कोईंबतूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवण्यात आले. त्याचे कारण मन विचलीत करणारे आहे. मासिक पाळी आल्याकारणाने या विद्यार्थिनीला चक्क वर्गातील दरवाजाजवळ बसवून परीक्षेचा पेपर लिहायला लावल्याची घटना घडली आहे. पीडीत तरुणी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आहे. मुलीच्या आईने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली आहे. तर, ग्रामस्थ उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा प्रशासनाने शाळेविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
पिडीत विद्यार्थिनी स्वामी चिदभवानंद मॅट्रिक माध्यमिक शाळेत शिकते. ही शाळा सेंगुट्टईपलायम गावात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी विज्ञान विषयाची परीक्षा होती आणि बुधवारी सामाजिक विज्ञानाची या दोन्ही विषयाची पेपर विद्यार्थिनीला वर्गाच्या बाहेर बसून देण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजीच्या संध्याकाळी तिने आईला याबाबत सांगितले. त्यानंतर बुधवारी तिची आई शाळेत गेली. तेव्हा पाहिले की मुलगी वर्गाबाहेर पेपर लिहिण्यासाठी बसली होती. त्यानंतर आईने याबाबतचा व्हिडिओ काढला आणि बुधवारी रात्री हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत, आई मुलीला विचारतेय की, तुला बाहेर कोणी बसवले. त्यावर ती उत्तर देते मुख्याध्यापकाने. त्यावर मुलीच्या आईने सवाल उपस्थित केलाय की, पीरियड्स आल्यावर यापद्धतीने मुलीला वर्गाच्या बाहेर बसवणे योग्य आहे का?. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अन्बिल महेश यांनी म्हटलं आहे की, कोईंबतूरच्या शाळेतील मुख्यध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. तसंच, शाळेला कारणे दाखवा नोटिसदेखील पाठवण्यात आली आहे. तसंच, या प्रकरणाची चौकशीदेखील करण्यात येत आहे. 

206
9838 views