logo

५०० वर्षे अबाधित राहील असे मंदिराचे दर्जेदार काम करा.. महत्वाच्या कामांना तातडीने निधी उपलब्ध करून देऊ – मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी विकास वाघ)

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मंदीर जीर्णोद्धाराचे काम पुढील किमान ५०० वर्षे अबाधित राहील अशा प्रकारचे गुणवत्ता पूर्ण काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व मंदिरातील सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करून श्रीक्षेत्र तुळजापूर मंदीर व परिसर विकास आराखड्याची बैठक घेतली. यावेळी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी लक्ष देऊन अतिशय उत्कृष्ट आराखडा बनविला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सदरील बैठकीस आ.राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव यांच्यासह वास्तु विशारद व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा, यासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले. आगामी दोन वर्षात मंदीर जीर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यासह किमान पुढील ५०० वर्ष हे काम अबाधित राहील अशा प्रकारचे दर्जेदार काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. पुढील दोन वर्षात या तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मंदीर पुनरबांधणीच्या कामात भवानी शंकर मंडपासमोरील काही स्तंभ बदलावे लागणार असून या ऐतिहासिक स्तंभाच्या कलाकृतीचे अनावरण मा.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. जे स्तंभ बदलावे लागणार आहेत, त्यावरील कोरीव काम ८ महिन्यात पूर्ण करण्याचे उदि्दष्ट आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानंतर प्रत्यक्षात हे स्तंभ जागेवर आणून मंदिराचे काम सुरू करून सहा महिन्यात ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
रुपये १८६६ कोटीच्या श्री तुळजाभवानी मंदीर व परिसर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळालेली आहे. यामध्ये दर्शन मंडप, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक कमानी, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी माता तलवार देतानाचे शिल्प, लेझर शो, बाग-बगीचा या प्रमुख बाबींचा समावेश आहे.

18
925 views