जमीनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी*
*100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट**नारवट येथील वन विभागाच्या तळयातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ* नांदेड, दि. 27 मार्च :- गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात येत आहे. हा गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतलाच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी काढण्यात आलेला गाळ विनामुल्य उपलब्ध होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत भोकर येथे सुधा प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व इतर विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह सेवा समर्पण परिवारातील सदस्य, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती. याकामासोबत नारवट येथील वन विभागाच्या तळयातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा गाळ वन विभाग, सेवा समर्पण परिवार व नारवट येथील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याचे काम आज सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथे भेट देवून 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमातंर्गत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. 00000