
ठाणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या उत्स्फूर्त परतिसादात क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना सक्रिय!
कल्याण: महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक आप्पासाहेब शिंदे यांच्या कल्याण पश्चिमेच्या सभागृहात संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. याप्रसंगी राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्याचे पदाधिकारी मिलींद क्षीरसागर, राजेंद्र पितळिया यांची विशेष उपस्थिती होती.
शालेय क्रीडा स्पर्धेत तसेच एकविध संघटनांच्या जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक 10 वी व 12 वी च्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने सवलतीचे अतिरिक्त गुण मिळतात. त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी प्रत्येक खेळाडूंचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा घाट क्रीडा विभागाने घातला आहे. क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर व इतर पदाधिकारी यांनी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांना भेटून त्रुटी दूर करण्याचे निवेदन दिले. या सर्व त्रुटी दूर करण्यात महासंघाला यश मिळाले. ऑनलाईन अर्ज भरताना दोन वेळा शुल्क भरणा करण्या बद्दलची दुरुस्ती करण्या विषयी पुढील वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बदल होतील असे मंडळाने खात्रीलायक आश्वासन दिले आहे, ही माहिती शरदचंद्र धारुरकर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली.
राज्य संघटनेच्या संलग्नतेखाली ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी निवडताना शरदचंद्र धारुरकर यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की, जेथे 6 महानगरपालिका व 8 तालुके आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेतील व तालुक्यांमधील क्रीडा शिक्षकांना जिल्हा संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. याअनुषंगाने ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष प्रमोद वाघमोडे (ठाणे महानगरपालिका), कार्याध्यक्ष ऐश्वर्या मदाने (कल्याण ग्रामीण), उपाध्यक्ष विशाखा आर्डेकर (ठाणे महानगरपालिका), अनंत उतेकर (कल्याण डोंबिवली महानगरपालिका, महेश बडेकर (उल्हासनगर महानगरपालिका)
जयराम गोंधळी (मुरबाड तालुका), कोषाध्यक्ष दौलत चव्हाण (शहापूर तालुका), सचिव गणेश मोरे (कल्याण डोंबिवली महानगरपालिका), कार्यालयीन सचिव राजेंद्र पवार (ठाणे महानगरपालिका), संघटक पांडुरंग ठोंबरे (ठाणे महानगरपालिका), महिला आघाडी आयेशा वाडकर (ठाणे महानगरपालिका), रोहिणी डोंबे (ठाणे महानगरपालिका), वृषाली मत्रे (ठाणे ग्रामीण), सिद्धी साळवी (कल्याण डोंबिवली महानगरपालिका), सदस्य सावित्री मोहिते (ठाणे महानगरपालिका) या सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ठाणे जिल्हा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहरात असेल असे शरदचंद्र धारुरकर यांनी घोषित केले. या सभेला महिला क्रीडा शिक्षिकांचा सहभाग लक्षणीय होता. ठाणे जिल्हा स्तरावर महासंघाचे केवळ महिलांसाठी एक स्वतंत्र युनिट निर्माण करण्याचा सर्व उपस्थित महिलांनी निर्धार केला.