logo

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : ४ हजार १४० अंतीम उमेदवार - मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम
















मुंबई, दि. ५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी महाराष्ट्र राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली.

मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते.

श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या १६ - नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ असा होता. त्यानुसार २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ७,०७८ इतके नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण २,९३८ अर्ज मागे घेण्यात आले.

मतदार नोंदणीत वाढ

दि.30 ऑक्टोबर रोजी अद्ययावत मतदारांची संख्या 9,70,25,119 असून यामध्ये पुरुष मतदार ५,००,२२,७३९ तर महिला मतदार ४,६९,९६,२७९ आहे. तर ६,१०१ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग (PwD Voters) मतदारांची एकूण संख्या ६,४१,४२५ इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या १,१६,१७० आहे.

राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात

१,१८१ मतदान केंद्रे

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात एकूण मतदान केंद्रे १,००,१८६ आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२,६०४ तर ग्रामीण मतदान केंद्र ५७,५८२ इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण १,१८१ मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात २१० मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या २४१ इतकी आहे.

ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १,००,१८६ इतक्या मतदान केंद्रांसाठी २,२१,६०० बॅलेट युनिट (२२१ %), १,२१,८८६ कंट्रोल युनिट (१२२ %) व १,३२,०९४ व्हीव्हीपॅट (१३२ %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी ५१६६ बॅलेट युनिट, ५१६६ कंट्रोल युनिट व ५१६५ व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक १८ ते २१ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण १८५ विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी निरिक्षक (Observer)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी १४२ सामान्य निरीक्षक (General Observer), ४१ पोलीस निरीक्षक (Police Observer) व ७१ खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा, भापोसे. (से. नि.), विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन, (Ex. IRS) व विशेष सामान्य निरीक्षक मोहन मिश्रा, भाप्रसे (से. नि.) यांची नियुक्ती केलेली आहे.

कायदा व सुव्यवस्था अंतर्गत दि. ४ नोव्हेंबरपर्यंतचा तपशील

राज्यातील वितरित केलेले एकूण शस्र परवाने ७८,२६७ इतके असून जमा करण्यात आलेली शस्रास्रे ५५,१३६ एवढी आहेत. जप्त करण्यात आलेली शस्रे २२९ तर परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली शस्रे ५७५ आहेत. परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे १०,६०३ इतकी असून जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे १,२९४ आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ४६,६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्ती

राज्यात दि. १५.१०.२०२४ ते दि. ०४.११.२०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या एकुण - २५२.४२ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये रोख रक्कम - ६३.४७ कोटी तर ३४,८९,०८८ लिटर दारु ( ३३.७३ कोटी रुपये किमतीची) जप्त करण्यात आली. ड्रग्ज ३८,२४,४२२ ग्राम (३२.६७ कोटी रुपये किमतीचे.) मौल्यवान धातू १४,२८,९८३ ग्राम (८३.१२ कोटी रुपये किमतीचे ), तर फ्रिबीज ३४,६३४ (संख्या) २.७९ कोटी रुपये किमतीचे आणि इतर ८,७९,९१३ (संख्या) ३६.६२ कोटी रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे.

सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वरील आचारसंहिता भंगाबाबतच्या २४५२ तक्रारी निकाली

दि. १५.१०.२०२४ ते ०४.११.२०२४ या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वर आचारसंहिता भंगाबाबतच्या २४६९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २४५२ (९९.३१%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच आज अखेर एनजीएसपी पोर्टल (NGSP Portal) वरील ७७९३ तक्रारीपैकी ५२०५ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समिती

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरण (PRE CERTIFICATION) साठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने ९० प्रमाणपत्राद्वारे ६२८ जाहिरातींना मान्यता देण्यात आलेली आहे.



1
2746 views